मुलाच्या प्रेमाची शिक्षा आई-वडिलांना; सांगलीत बेदम मारहाणीत बापाचा दुर्दैवी मृत्यू

Sangli Crime : प्रेमप्रकरणातून मुलाच्या वडिलांना मुलीच्या नातेवाईकांनी विद्युत खांबाला बांधून लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. यात मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी सात जणांना अटक केली आहे.

आकाश नेटके | Updated: Jan 18, 2024, 08:34 AM IST
मुलाच्या प्रेमाची शिक्षा आई-वडिलांना; सांगलीत बेदम मारहाणीत बापाचा दुर्दैवी मृत्यू title=

सरफराज मुसा सनदी, झी मीडिया, सांगली : प्रेमप्रकरणातून एका मुलाच्या बापाला आणि आईला विद्युत खांबाला बांधून करण्यात आल्याचा खळबळजन प्रकार सांगली जिल्ह्यात समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. सांगली पोलिसांनी याप्रकरणी 12 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी सात आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र या घटनेमुळ सांगलीत दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या मांगले येथे बुधवारी पहाटे हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलीला पळवून नेल्याच्या रागातून मुलाच्या आई-वडिलांना विजेच्या खांबाला बांधून मारहाण करण्यात आली. या मारहाणीत मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला. तर आई गंभीर जखमी झाली आहे. दादासाहेब रामचंद्र चौगुले ( वय 55 , रा.मांगले) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शिराळा पोलीसांनी बारा संशयितावर गुन्हा दाखल केला असून यापैकी संशयित सुरेश महादेव पाटील , संजय महादेव पाटील, रविंद्र मधुकर पाटील, संदीप पाडळकर (रा.मांगले) या संशयितांना चौघांना करण्यात आली आहे. 

मांगले या ठिकाणी राहणाऱ्या मृत दादासो चौगुले यांच्या मुलाचे गावातल्या एका मुलीबरोबर प्रेमप्रकरण होतं. दोघांच्या प्रेमप्रकरणाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. याच प्रेमप्रकरणातून मुलीच्या आई-वडिलांसह नातेवाईकांनी दादासो चौगुले व त्यांची पत्नी राजश्री चौगुले या दोघांना विजेच्या खांबाला बांधून बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या दादासो चौगुले यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत शिराळा पोलीस ठाण्यामध्ये 12 जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून सात जणांना अटक देखील करण्यात आली आहे. या घटनेमुळे शिराळा तालुक्यासह सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादासाहेब चौगुले यांचा मुलगा गणेश याने संशयित आरोपी सुरेश महादेव पाटील यांच्या मुलीला बुधवारी  पहाटे प्रेमसंबंधातून पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला होता. दादासो चौगुले व त्यांची पत्नी राजश्री पहाटे मोटरसायकलवरून जनावरांचे दूध काढण्यासाठी मांगले येथील धनटेक येथे गेले होते. दादासाहेब दूध काढण्यासाठी आल्याचे समजताच सुरेश पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी दादासाहेब व त्यांच्या पत्नीला आमची मुलगी तुमचा मुलगा घेऊन गेला आहे. तो कोठे गेला आहे, ते सांगा, असं विचारलं. यावर  आम्ही आत्ताच आलो आहे, आम्हाला काही माहिती नाही, असं दादासाहेब चौगुले यांनी सांगितलं.

त्यानंतर सुरेश पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी दादासाहेब आणि त्यांच्या पत्नीला विजेच्या खांबाला बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीनंतर दादासाहेब चौगुले बेशुद्ध अवस्थेत खाली पडले. त्यांनतर पाटील कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात नेले. मात्र पुढील उपचारांसाठी चौगुले यांना शिराळा येथील उपजिल्हा रूग्णालयात हलवण्यास सांगितले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात व उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती. आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.