संघर्षाला हवी साथ : एका कोकणकन्येचा संघर्ष!

दहावीच्या परीक्षेत यंदाही कोकण अव्वल ठरलं. आज संघर्षाला हवी साथमध्ये एका कोकणकन्येचा संघर्ष... दापोलीतल्या जागृती जयेंद्र मंडपेला दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के मिळवलेत... कुणाचाही खंबीर पाठिंबा नसताना जागृतीनं मिळवलेलं हे यश कौतुकास्पद आहे.

Updated: Jul 7, 2017, 07:55 PM IST
संघर्षाला हवी साथ : एका कोकणकन्येचा संघर्ष!   title=
प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : दहावीच्या परीक्षेत यंदाही कोकण अव्वल ठरलं. आज संघर्षाला हवी साथमध्ये एका कोकणकन्येचा संघर्ष... दापोलीतल्या जागृती जयेंद्र मंडपेला दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के मिळवलेत... कुणाचाही खंबीर पाठिंबा नसताना जागृतीनं मिळवलेलं हे यश कौतुकास्पद आहे.
 
दापोलीतल्या गिम्हवणे गोसावी वाडीत जागृती मंडपे राहाते. जेमतेम दहा बाय दहाची खोली... घरची परिस्थिती बेताचीच... वडील आजारी, आई रोज वीस किलोमीटर लांब चहा करण्यासाठी जाते. आईला महिन्याकाठी मिळतात फक्त ३,००० रुपये... या तीन हजारांत संसाराचा गाडा कसाबसा चालतो. आई घरी येईपर्यंत सगळी कामं जागृतीलाच करावी लागतात. एवढं सगळं सांभाऴूनही जागृतीला दहावीत तब्बल ९४ टक्के मिळालेत.
 
जागृतीला अभ्यासाबरोबरच चित्रकला आणि खेळांचीही आवड आहे. घरचं सगळं सांभाळून जागृतीला दहावीत एवढं मोठं यश मिळालं. त्यामुळे कष्टांचं चीज झाल्याचं समाधान तिच्या आईनं - मधुरा मंडपे यांनी व्यक्त केलंय.  
 
जागृतीची मोठी बहीण महाविद्यालयात शिकते. धाकटा भाऊ शाळेत शिकतो. आत्तापर्यंत पदरमोड करुन, उसनवारीनं, प्रसंगी दागिने गहाण ठेवून आईनं तीन मुलांचं शिक्षण केलं. पण आता मात्र मुलांना पुढे शिकवणं कठीण आहे... एवढ्या खडतर परिस्थितीची जाणीव ठेवून जागृतीनं यश मिळवलंय. तिच्या पुढच्या शिक्षणासाठी तिच्या पाठीशी उभं राहायलाच हवं...

या गुणवंतांना सढळ हस्ते मदत करण्यासाठी तुम्हीही पुढे या.... त्यासाठी या विद्यार्थ्यांच्या नावानंच चेक काढा... 

संपर्कासाठी :

झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेड, मधू इंडस्ट्रीयल इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई - ४०० ०१३

संपर्क : 022 - 24827821

ई-मेल : response.zeemedia@gmail.com