संघर्षाला हवी साथ : पेपर टाकून, गॅरेजमध्ये काम करून ९१ टक्के

दुपारी शाळा आणि संध्याकाळी गॅरेजमध्ये काम असा होता प्रवीणचा दिनक्रम 

Updated: Aug 11, 2018, 11:07 AM IST
संघर्षाला हवी साथ : पेपर टाकून, गॅरेजमध्ये काम करून ९१ टक्के  title=

जयेश जगड, झी मीडिया, वाशिम : छोट्या छोट्या अपयशासाठी आपण बरीच कारणं शोधतो... पण, परिस्थितीनं बंड केलेलं असतानाही त्याला तोंड देत अनेक जण उभे राहातात... वाशिममधला प्रवीण दुधेवार हा त्यापैंकीच एक...

प्रवीण वाशिममधल्या काळेफैल भागातल्या गॅरेजमध्ये काम करतो... हे काम करत करतच प्रवीणनं दहावीची परीक्षा दिली... त्यात त्याला तब्बल ९१.२० टक्के मिळाले... राजेशच्या वडिलांचं १३ वर्षांपूर्वी निधन झालं... त्याची आई शेतात मजुरी करते... घराची जबाबदारी प्रवीणच्या खांद्यांवर आली... प्रवीण रोज सकाळी पेपर टाकायचा... दुपारी शाळा आणि संध्याकाळी गॅरेजमध्ये काम असा प्रवीणचा दिनक्रम असायचा... 

त्यात कुठलीही शिकवणी नाही, पण कुठलीही सबब न सांगता, आणि परिस्थितीचा बाऊ न करता, प्रवीणनं  दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवलंय. प्रविणच्या आईनं परिस्थितीशी झगडत मुलाला मोठं करण्याचं स्वप्न पाहिलंय. काम मिळालं तरच चूल पेटते, अशी प्रवीणच्या घरची परिस्थिती.... 
 
रोज पेपर वाटून, गॅरेजमध्ये काम करुनही प्रवीणनं कधी शाळा चुकवली नाही. घरात अठरा विश्व दारिद्र्य असताना परिस्थितीशी झगडत प्रवीण उभा राहिलाय... अशा गुणवंतांना मदत करण्यासाठी पुढे याच... त्यांच्या स्वप्नांना थोडासा हातभार आपणही लावायलाच हवा... 

परिस्थितीशी झगडून, बिकट वाट दिसत असतानाही ज्यांनी संघर्ष करुन अभ्यास केला आणि दहावीला उत्तम गुण मिळवले, अशा विद्यार्थ्यांच्या संघर्ष कहाण्या आम्ही रोज दाखवतोय... या गुणवंतांमध्ये जिद्द आहे, काहीतरी करुन दाखवण्याची ताकद आहे.... अशा गुणवंतांच्या पाठीशी आपण उभं राहायलाच हवं... थोडीशी सामाजिक बांधिलकी आपणही जपायला हवी... त्यासाठीच पुढे या... या गुणवतांना सढळ हातांनी मदत करा, त्यांची स्वप्न पूर्ण करा...  

तुम्हालाही मदत करायची असल्यास संपर्क करा

संपर्क क्रमांक : ०२२ - ७१०५५०२६

पत्ता : झी २४ तास, १४ वा मजला, 

ए विंग, मॅरेथॉन टॉवर, 

लोअर परळ, मुंबई - ४०००१३

ई-मेल : havisaath@gmail.com