राणे समर्थकांना राडा भोवला, कणकवली नगराध्यक्ष, माजी जि.प. अध्यक्षांना सक्तमजुरीची शिक्षा

वेंगुर्ले येथील राजकीय राड्याचा निकाल लागला आहे. राणे समर्थकांना शिक्षा.

Updated: Sep 7, 2019, 10:04 AM IST
राणे समर्थकांना राडा भोवला, कणकवली नगराध्यक्ष, माजी जि.प. अध्यक्षांना सक्तमजुरीची शिक्षा  title=

सिंधुदुर्ग : वेंगुर्ले येथील राजकीय राड्याचा निकाल लागला असून राणेंसमर्थक तत्कालीन जिल्हापरिषद अध्यक्ष आणि कणकवलीच्या नगराध्यक्षांना ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. या निकालानंतर जिल्ह्यात राजकीय भूकंप झाला आहे. पुन्हा एकदा राणे आणि राणे समर्थकांचे विरोधक आक्रमक झाले आहेत.

१ डिसेंबर २०११ मध्ये वेंगुर्ले पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचा आदेश तोडून वेंगुर्ल्यात घडवलेला राडा आणि तत्कालीन शिवसेना आमदार परशुराम उपरकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कट्टर राणे समर्थक म्हणून ओळखले जाणारे कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे आणि जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष, विद्यमान अध्यक्षांचे पती संदेश तथा गोट्या सावंत यांना गुरुवारी जिल्हा न्यायालयाने सात वर्ष सश्रम कारावास  आणि ३१,५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. याच गुन्ह्यातील उर्वरित ४४ आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले. या निकालानंतर राणे समर्थक पुन्हा एकदा टीकेचे धनी होऊ लागलेत

वेंगुर्ले पालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसचे स्थानीक नेते विलास गावडे आणि तत्कालीन काँग्रेसचे नेते नितेश राणे यांच्यात ठिणगी पडली आणि राड्याला सुरुवात झाली होती गावड़े यांना इतर सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा देत नितेश राणे यांना त्यावेळी तब्बल ५ तासाहून अधिक काळ घेराव घातला. या बातमी नंतर जिल्ह्यातील सर्व राणे समर्थकांनी वेंगुर्लेकडे धाव घेतली. नारायण राणे आणि नीलेश राणे ही रत्नगिरीवरुन रात्री वेंगुर्ल्यात पोहोचले आणि त्यानंतर खऱ्या राड्याला सुरवात झाली. जिल्हा न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात स्वाभिमान पक्ष उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.

तब्बल ८ वर्षानंतर या निकालाच्या निमित्ताने वेंगुर्ले राड्याच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. यानंतर पुन्हा एकदा राणे आणि राणे समर्थकांचे विरोधक आक्रमक झाले असून टीकेची झोड उठवत आहेत. या निकालाच निमित्त धरुन भाजपच्या काही नेत्यांकडून राणेंना भाजपमध्ये न घेण्याचे बोलले जात आहे. वेंगुर्ले राड्याच्या निकालामुळे राणेंचे विरोधक राणेंना घेरण्याच्या तयारीला लागले आहेत. आठ वर्षानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा वेंगुर्लेचा राडा चर्चेत आला असून हा राडा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा प्रमुख मुद्दा असणार यात शंका नाही.