कोल्हापूर : Rajya Sabha election: राज्यसभा निवडणुकीबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. सहाव्या जागेसाठी ही उत्कंठा आहे. दरम्यान, संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी राज्यसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांना कोणाचा पाठिंबा मिळणार याची उत्सुकता आहे. शिवसेनेने सहावा उमेदवार देण्याचे जाहीर केले तसेच या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यात जमा आहे. दरम्यान, आपली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे, अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली. छत्रपती घराण्याचा मान राखतील अशी आशा संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केली.
राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढवणार आहे. संजय राऊतांसह राज्यसभेसाठी कोल्हापुरातून संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याची खेळी शिवसेना खेळण्याची शक्यता आहे. संजय पवार हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. कोल्हापुरातून संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्यावर आता त्यांना शह देण्यासाठी कोल्हापूरचाच उमेदवार देण्याच्या शिवसेनेत हालचाली सुरू आहेत अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान, संभाजीराजे याच्या उमेदवारीबाबत आज पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. संभाजी राजे यांची मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली अशी माहिती त्यांनीच मीडियाला दिली आहे. तर दुसरीकडे संभाजीराजे काही केल्या शिवबंधन बांधणार नाहीत, अशी सूत्रांची माहिती आहे.
महाविकास आघाडीचा अपक्ष उमेदवारी मिळावी यासाठी संभाजीराजे प्रयत्नशील आहेत. हे झालं नाही तर शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून संभाजीराजे हे या निवडणुकीत उडी घेणार आहेत, अशीही माहिती आहे.
तसेच आज संभाजीराजे आणि मुख्यमंत्री यांची भेट होवू शकते, अशी माहिती हाती आली आहे. आजच्या भेटीनंतर संभाजीराजे याच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती आहे. संभाजीराजे यांनी कोणत्या पक्षात प्रवेश करु नये तर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी यासाठी घरातूनही आग्रह आहे. अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावी, अशी महाराष्ट्रातील संभजीराजे छत्रपती समर्थकाची भूमिका आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याची उत्सुकता आहे.