मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद : खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी आज नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळत नसल्याच्या भीतीने गळफास लावून आत्महत्या केलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील देवळाली गावातील अक्षय देवकर याच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. पीडित कुटुंबाचे दुःख पाहून संभाजीराजे यांना अश्रू अनावर झाले.
अक्षयच्या आईने अक्षयची होत असलेली घुसमट बोलून दाखवली. आपण मराठा समाजात जन्माला येऊन चूक केली असं अक्षय नेहमी म्हणायचा, असं त्याच्या आईने सांगितले. यावेळी संभाजीराजे भावूक झाले. तुमचं दुःख बघून मी व्यथित झालो आहे. माझ्या परीने होईल त्या गोष्टी करण्याचा मी प्रयत्न करेन, असं आश्वासन संभाजीराजे यांनी पीडित कुटुंबियांना दिले. मी तुमच्या सोबत कायम राहणार आहे, म्हणून खचून जाऊ नका, असा धीर ही त्यांनी दिला.
पूर्ण शिक्षण पद्धतीतच दोष असून ही शिक्षण व्यवस्था सुधारल्याशिवाय पर्याय नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं. 12वी पर्यंत मोफत शिक्षण दिले पाहिजे. या मागणीचा त्यांनी आणखीन पुनरुच्चार केला. या संदर्भात मी संसदेत आवाज उठवणार आहे व मुख्यमंत्री यांच्यासोबतही याविषयावर चर्चा करणार असल्याचं वक्तव्य संभाजीराजे यांनी केले.
देवळाली या गावातील अक्षय देवकर याने 10वीच्या परीक्षेत 94.20 टक्के मिळवले होते. मात्र चांगले गुण मिळूनही चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल का? या भीतीने अक्षयने 20 जून रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी यावर संताप व्यक्त करत आरक्षण गेलं खड्ड्यात, सर्व समाजाला 12वी पर्यंत मोफत शिक्षण द्यावं, अशी मागणी केली होती.