छत्रपती संभाजीनगरमधील इंदिरा नगर परिसरात दोन महिन्यांपूर्वीच विद्या कीर्तिशाही आणि अमित साळुंके यांचा विवाह झाला. विद्या नवबौध्ध समाजातील असून अमित साळुंके गोंधळी समाजाचा आहे.
दोघांची जात वेगळी असल्यामुळे विद्याच्या आई-वडिलांचा आणि चुलत भावांचा कडाडून विरोध होता. घरच्यांच्या विरोधानंतर दोघांनी 2 मे रोजी पुण्यातील आळंदीमध्ये लग्न केलं. दोघं महिनाभर तिथेच राहिले. तेव्हाही धमक्या येतच होत्या. कुठे दिसलात तर सैराट सारखं जीवे मारुन टाकू अशी धमक्या दिल्या जात होत्या. परक्या गावात काही झालं तर मदतीला कुणी नाही, कुणाला काही झालं तरी कळणार नाही म्हणून ते दोघेही पुन्हा आपल्या मूळ गावी आले.
पण जे न व्हावे तेच झाले. 14 जुलै रोजी अमितला घराबाहेर बोलवून त्याच्या पोटात चाकू खुपसण्यात आला. त्याच्यावर ८ वार झाले. तात्काळ अमितला रुग्णालयात दाखल केले. पण त्याचा उपचारादम्यान जीव गेला.
या प्रकरणानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे याचा 'सैराट' हा सिनेमा पुन्हा चर्चेत आला आहे. नागराजने हा सिनेमा दिग्दर्शित केला तेव्हा त्याने समाजाचं भीषण वास्तव जगासमोर मांडल होतं. समाजाचं हे कडू सत्य जगासमोर आणून आज 8 वर्षे झाले. पण परिस्थिती मात्र बदलली नाही. आजही समाजात ऑनर किलिंगच्या घटना घडतच आहेत. सैराट हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा नागराजने जात, ऑनर किलिंग, धर्मयावर आपली प्रतिक्रिया दिली होती. पुन्हा एकदा तो विचार ऐकणे महत्त्वाचं आहे.
सामाजिक प्रश्नांवर सिनेमे तयार व्हायला हवेत. दलित, महिला, जात-धर्म बाबतचे वेगवेगळे विषय सिनेमांमधून मांडणे गरजेचे आहे. पण चित्रपटांमधून समाजप्रबोधन करणे कठीण असल्याचं नागराज एका कार्यक्रमात म्हणाला होता. तसेच जातीबद्दल बोलण्याची गरज आहे. अन्यथा यावर आपण काहीही चुकीचं घडत नाही असं ढोंग केलं तर आजारपण वाढेल पण त्यावर उपाय निघणार नाही. ऑनर किलिंग चुकीचं आहे. हिंसाचार चांगला नाही किमान एवढं तरी लोकांना 'सैराट'मधून कळायला हवं होतं. पण लोकांना 'झिंगाट' आवडलं.