शिर्डी : शंभरी पार केलल्या आणि साईबाबांच्या हयातीतच सुरू झालेल्या रामनवमी उत्सवाला साईंच्या पोथी आणि फोटोच्या मिरवणुकीने सुरूवात झाली. तीन दिवस चालणा-या या उत्सवात सहभागी होण्यासाठी जवळपास दोनशे पालख्यांच्या माध्यमातून शिर्डीत दाखल होत असलेल्या हजारो पदयात्रींनी शिर्डी फुलून गेली आहे. या यात्रेच्या निमीत्तानं शिर्डीकरांनीही भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केलंय.
मंदिर परिसरात विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आलीय. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईच्या द्वारकामाई मंडळानं परिसरात भगवान शंकराचा महाद्वाराचा आकर्षक देखावा उभारलाय. शिर्डीतील 42 तरुणांनी रामनवमीला साई समाधीला स्रान घालण्यासाठी काशीवरून 1370 किमी अंतरावरुन 41 दिवसांचा प्रवास करून पदयात्रेनं पाणी आणलंय.