कोविड-१९ नियमावली अंमलबजावणीचा रायगडात फज्‍जा

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव (Coronavirus) रोखण्‍यासाठी शासनाने कठोर निर्बंध घातले आहेत. परंतु याची कुठलीच अंमलबजावणी होताना दिसत नाही . 

Updated: Apr 7, 2021, 07:12 AM IST
कोविड-१९ नियमावली अंमलबजावणीचा रायगडात फज्‍जा title=
छाया - प्रफुल्ल पवार, अलिबाग

अलिबाग : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव (Coronavirus) रोखण्‍यासाठी शासनाने कठोर निर्बंध घातले आहेत . परंतु काल पहिल्‍याच दिवशी रायगड ( Raigad ) जिल्‍हयात याची कुठलीच अंमलबजावणी होताना दिसत नाही . शासन नियमाावलीची स्‍पष्‍टता नसल्‍याने नागरिक संभ्रमात आहेत. शासनाच्‍या नियमांचा पुरता फज्‍जा उडाल्‍याचे चित्र आहे. जिल्‍हयात केवळ वाइन शॉप वगळता सर्व प्रकारची दुकाने सताड उघडी होती. ( Raigad shops Open) बाजारात गर्दी काहीशी कमी असली तरी सोशल डिस्‍टन्‍सिंग किंवा इतर नियमांचे फारसे पालन होताना दिसत नव्हते. सर्व व्‍यवहार सुरळीत सुरुच होते. 

किराणा मालाच्या दुकानाबरोबरच कापड , ज्वेलर्स , इलेक्टरीक साहित्य , स्टेशनरी , मोबाईल ची दुकाने देखील सुरु होती. हॉटेलमधून ग्राहकांना पार्सलद्वारे खाद्य पदार्थ पुरवले जात होते. भाजी मंडईत खरेदीसाठी नेहमीप्रमाणे गर्दी पाहायला मिळाली. व्यापाऱ्यांनी काल सकाळी नेहमीप्रमाणे दुकाने उघडली होती. त्यामुळे बाजारात गर्दी दिसून येत होती. दरम्यान, पोलिसही कुठली कारवाई करताना दिसत नव्हते .

रायगड जिल्ह्यात अलिबागसह पेण , पनवेल , उरण , रोहा , महाड , माणगाव या सर्वच बाजारपेठामध्ये सर्व व्यवहार सुरळीत सुरु होते . त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमावलीला हरताळ फासला जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. एस टी सेवेबरोबरच खाजगी प्रवासी वाहतूक सुरू होती मात्र त्यातही नियम डावलून प्रवाशांची ने - आण केली जात होती.

दारुची दुकाने बंद

शासनाच्या नियमावलीत दारूची दुकाने सूरु राहतील असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र काल सकाळी ही दुकाने बंद असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे तळीरामांचा पुरता हिरमोड झाला होता . याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता उत्पादन शुल्क विभागाने स्वतंत्र अध्यादेश काढला असल्याचे स्पष्ट करण्यात आले. रेस्टॉरन्टसह असलेल्या बारमधून पार्सल सेवा मात्र सुरु होती.