जवाहर नवोदय विद्यालयात रॅगिंगची मालिका, मुलांना न पाठविण्याचा इशारा

कागलच्या जवाहर नवोदय विद्यालयात रॅगिंगची मालिका सुरू असल्याचे पुढे आलेय. 

Updated: Dec 20, 2018, 08:53 PM IST
जवाहर नवोदय विद्यालयात रॅगिंगची मालिका, मुलांना न पाठविण्याचा इशारा title=

कोल्हापूर : कागलच्या जवाहर नवोदय विद्यालयात रॅगिंगची मालिका सुरू असल्याचे पुढे आलेय. आणखी एका पालकाने आपल्या मुलांवर झालेल्या रॅगिंगची कैफियत जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मांडली आहे. रॅगिंगबाबत तक्रार केल्यानंतरही संबंधित हाऊस मास्टरने रॅगिंग करणाऱ्यांना पाठिशी घातल्याचा आरोप पीडित मुलाच्या पालकांनी केलाय. 

या मुलाने रॅगिंगच्या प्रकारानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे हाऊस मास्टर लिमये यांनी चौकशी करुन जबाबदार मुलांवर कारवाई करण्याऐवजी पीडित मुलाला घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिल्याचा आरोप पालकांनी केलाय. त्यानंतर पालकांनी या विद्यार्थ्याला शाळेतून काढलं. मात्र या पीडित विद्यार्थ्याच्या दाखल्यावर होमसिक नेस अँड नॉट रेडी टू स्टडी, असा शेरा मारला. गेले वर्षभर या मुलाचे पालक गप्प होते. मात्र आता रॅगिंगचे प्रकार समोर आल्यानंतर या मुलाच्या पालकांनी दोषींवर कडक कारवाईची मागणी केलीय. त्याचवेळी कारवाई केली असती तर आताचे रॅगिंगचे प्रकार झाले नसते असेही या मुलाच्या पालकांनी म्हटलंय. 

रॅगिंग प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा आमच्या मुलांना विद्यालयात सोडणार नाही. अशी भूमिका रॅगिंग झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांनी व्यक्त केली आहे. रॅगिंगच्या नावाखाली सहावी, सातवी आणि आठवीच्या अऩेक मुलांना  बेदम मारहाण झाल्यानंतर नवोदय महाविद्यालयातील अनेक पालकांनी भीतीपोटी आपल्या मुलांना घरी नेणं पसंद केलय. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी, याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान रॉगींग करणाऱ्या विदयार्थांच्याबाबत विद्यालयातील रेक्टर आणि हाऊस मास्टर यांना कल्पना होती, तरी देखील त्यांनी याकडं दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मारहाण करणाऱ्या विद्यार्थाच्याबरोबरच संबधीत रेक्टर आणि हाऊस मास्टर यांच्यावर काय करवाई होणार याकडं सर्वाचं लक्ष लागून राहिले आहे.