सागर आव्हाड / पुणे : Pune Housing Society Scam : पुण्यात 200 कोटी रुपयांचा गृहप्रकल्प घोटाळा उघडकीस आला आहे. वारजेतील रामनगर गृहरचना सहकारी सोसायटीतला हा घोटाळा उघड झाला आहे. सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव यांनी मिळून मूळ सभासदांच्या हक्काच्या सदनिका भलत्याच लोकांना विकून ही फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बिल्डरच्या मदतीने 396 सदनिका बांधण्यात आल्या होत्या. यापैकी 218 जणांकडून रक्कम घेऊनही सोसायटीचा चेअरमन अंबादास गोटे आणि गणेश माने यांनी इतरांना घरं विकल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. या गैरव्यवहार प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वारजे माळवाडी येथील रामनगर गृहनिर्माण सहकारी संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्या विरोधात पुणे शहर पोलिसांनी 200 कोटी रुपयांची मालमत्ता इतर सभासदांच्या मालकीची विक्री करून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम नगर सहकारी संस्थेचे मूळ 218 सदस्य होते. त्यांना ही जमीन सरकारने दिली होती. मालमत्ता विकसित करण्यासाठी आरोपींनी 1990 पासून सभासदांकडून पैसे घेतले. त्यांनी सरकारकडून 1 हेक्टर 76 गुंठे जमीनही संपादित केली. एकूण 396 सदनिका बांधून आरोपींनी मूळ सदस्यांना न देता ते इतर लोकांना विकले असल्याचे पुढे आले आहे. तसेच आरोपींकडून सरकार आणि न्यायालयाला खोटी माहिती देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.