मोदी-चंद्रचूड आरतीवरुन वाद: फडणवीस 'त्या' इफ्तारचा फोटो शेअर करत म्हणाले, 'फरक फक्त...'

Modi Visit CJI Chandrachud Home Manmohan Singh Iftar Party Photo: चंद्रचूड यांच्या घरी जाऊन मोदींनी गणपतीची आरती केल्याचा मुद्दा चर्चेत असतानाच आता फडणवीसांनी हा फोटो शेअर केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 13, 2024, 08:38 AM IST
मोदी-चंद्रचूड आरतीवरुन वाद: फडणवीस 'त्या' इफ्तारचा फोटो शेअर करत म्हणाले, 'फरक फक्त...' title=
फडणवीस यांची पोस्ट चर्चेत

Modi Visit CJI Chandrachud Home Manmohan Singh Iftar Party Photo: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन गणपतीची आरती केली. मोदींनी या भेटीचा फोटो सोशल मीडियावरुन शेअर केल्यानंतर विरोधकांनी या मुद्द्यावरुन टीका केली आहे. देशातील न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीने धर्मनिरपेक्ष कारभाराला प्राधान्य दिलं पाहिजे, अशा आशयाची विधानं करत पंतप्रधानांनी अशी भेट देणं संविधानासाठी धोक्याचं असल्याची टीका करण्यात येत आहे. विरोधकांनी यावरुन आक्षेप नोंदवला असतानाच आता भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आयोजित केलेल्या एका इफ्तार पार्टीचा फोटो शेअर करत निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे या नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील भाजपाचे सर्वोच्च नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश आहे.

कधीचा आहे हा फोटो?

फडणवीस यांनी शेअर केलेला फोटो हा 2009 मधील आहे. हा फोटो शेअर करताना फडणवीस यांनी, "18 सप्टेंबर 2009 रोजी तत्कालिन पंतप्रधानांच्या निवासस्थानी तत्कालिन सरन्यायाधीश उपस्थित असल्याचे फोटो आणि संबंधित बातमीची लिंक," असं म्हटलं आहे. फडणवीसांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबरोबर तत्कालीन सरन्यायाधीश के. जी. बालकृष्ण तसेच परराष्ट्र सचिव निरुपमा रॉय दिसत आहेत.

...तर इतका गहजब का? फडणवीसांचा सवाल

"गणेशोत्सवाची देशभरात सर्वत्र धूम आहे. आस्थेने गणरायाचे पूजन केले जात आहे. काल तर गौरी-गणपतीतील महालक्ष्मीपूजन सुद्धा होते. देशाचे माननिय सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूडजी यांच्याकडे काल पंतप्रधानांनी गणरायाची आरती केली आणि महालक्ष्मी पूजन सुद्धा केले. सरन्यायाधीश महाराष्ट्रातील आहेत. दिल्लीत खास महाराष्ट्रीयन व्यक्तीकडूनच ते दरवर्षी गणरायाची मूर्ती पूजेसाठी आणतात. पण अचानक इकोसिस्टीम अशी कार्यान्वित झाली की, जणू आभाळ कोसळले. फरक फक्त इतकाच आहे की, आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे. पण, गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेले तर इतका गहजब का?" असा सवाल फडणवीसांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन विचारला आहे.

नक्की वाचा >> 'निवृत्तीनंतरची ‘सोय’...', चंद्रचूडांवर ठाकरेंच्या सेनेची टीका! म्हणाले, 'शेवटचा खांब मोदींनी...'

तसेच पुढे फडणवीसांनी, "हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी?" असं म्हणत, "प्रश्न गहन आहे," असा टोला लगावला आहे. "हा महाराष्ट्रीयन सणांचा, महाराष्ट्र धर्माचा, मराठी संस्कृतीचा गौरी-गणपतींच्या भक्ती आणि श्रद्धेचा... अपमान नाही का?" असा प्रश्नही फडणवीसांनी विचारला आहे.

"राऊत ठाकरेंच्या घरी रोज मुजरा करतात त्याचे..."

पंतप्रधान मोदींनी सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन गणरायाची पूजा केल्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपाला प्रविण दरेकरांनाही विरोध केला आहे. "आधी त्यांचा हिंदूंचा द्वेष आम्ही समजू शकतो मात्र आता देवी देवतांवर देखील ते स्वतःच्या राजकारणासाठी अशी टीका करत आहेत. देवदर्शनासाठी जर पंतप्रधान जात असतील तर त्यांच्या पोटात दुखण्याचा काही कारण नाही. यांना मनमोहन सिंग इफ्तार पार्टीला जातात ते चालतं. चंद्रचूड यांच्या घरी देवदर्शनाला गेले यात काही चूक असल्याचं कारण नाही. देवांचा वापर स्वतःचा राजकारणासाठी करायचा ही केविलवाणी परिस्थिती आता आली आहे. हा महाराष्ट्राचा महाराष्ट्र धर्माचा आणि हिंदू देवांचा अपमान आहे," असं दरेकर विरोधकांच्या आक्षेपावर प्रतिक्रिया देताना म्हणाले.

नक्की वाचा >> फडणवीसांच्या घरी गणपती दर्शनसाठी BJP आमदारांची गर्दी! प्रसादाबरोबर मिळाले 'हे' 5 सल्ले

तसेच संजय राऊत यांनी याच मुद्द्यावरुन केलेल्या टीकेवर भाष्य करताना दरेकरांनी, "संजय राऊत कुठे कुठे झुकतात याचा लेखाजोखा आता आम्हाला काढावा लागेल. घरी पाहुणे आले की नमस्कार करायचा शिष्टाचार, परंपरा आहे. मात्र याला झुकणं म्हणत असाल तर तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या घरी रोज मुजरा करतात त्याचे काय? राहुल आणि सोनिया यांच्याकडे लोटांगण घालतात हे आम्हाला माहिती आहे," असा टोला लगावला.