Maharastra Politics : तरुणांच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी युवा संघर्ष यात्रा सुरू केली होती. या यात्रेत (Yuva Sangharsh yatra) तरुणांचा मोठा सहभागदेखील दिसून आला होता. अशातच आता रोहित पवार यांनी धक्कादायक निर्णय घेतला आहे. युवा संघर्ष यात्रा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय रोहित पवार घेतला आहे. राज्यातील मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं यावेळी रोहित पवारांनी सांगितलं.
आम्ही संवदेनशील आहोत. आमचीच मुलं आत्महत्या करतात. त्यामुळे आम्ही ही यात्रा पुढे घेऊन जाऊ शकत नाही. राज्यातील युवा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. जरांगे पाटलांची प्रकृती खालावत चालली आहे. अशांत झालेला स्वाभिमानी महाराष्ट्र शांत व्हायला हवा. त्यासाठी यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मराठा समाजातील युवक राजकारणामुळे जास्त त्रस्त झालेत. खोटी आश्वासनं दिली जातात. राज्य सरकार मराठा, धनगर समाजाच्या बाबतीत संवेदनशील नाही. आम्ही ही यात्रा युवा हितासाठी काढली, असंही ते म्हणाले. त्यावेळी, गावबंदीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा थांबवता आहात का? असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावेळी रोहित पवारांनी स्पष्ट नकार दिला. मी गावबंदीमुळे अजिबात स्थगिती केली नाही, तर ज्यांच्यासाठी ही यात्रा काढली, ते युवा अस्वस्थ असताना ही यात्रा सुरू ठेवणे योग्य नाही, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
मराठा समाजाचं आरक्षण, महाराष्ट्रात निर्माण झालेली अस्वस्थता आणि #युवा_संघर्ष_यात्रा याबाबत मी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली... ही #युवा_संघर्ष_यात्रा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबतचं विवेचन असलेली लिंक शेअर करत आहे.
https://t.co/Fngn9G9UqL— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 27, 2023
दरम्यान, कंत्राटी नोकरभरती रद्द करण्यासाठी तसेच, 2 लाख 50 हजार उमेदवारांची रखडलेली भरती प्रक्रिया तात्काळ सुरु करण्यात यावी, या मागणीसाठी... अवाजवी परीक्षा शुल्क रद्द, जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, रोजगार युवांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज माफी मिळावी, अशा अनेक मागण्यांसाठी रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा सुरू केली होती. शाळा दत्तक योजना रद्द करावी, नोकरदार महिला आणि विद्यार्थिनींसाठी वसतिगृहे मिळावी, अशा मागण्या देखील रोहित पवार यांच्याकडून करण्यत आल्या होत्या.