भाजपच्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीला रोहिणी खडसेंची दांडी

उत्तर महाराष्ट्रातील पराभूत उमेदवारांच्या बैठकीला रोहिणी खडसे यांनी दांडी मारली.  

Updated: Dec 16, 2019, 10:07 PM IST
भाजपच्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीला रोहिणी खडसेंची दांडी  title=
संग्रहित छाया

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील पराभूत उमेदवारांच्या बैठकीला रोहिणी खडसे यांनी दांडी मारली. भाजप नेते आशिष शेलार यांच्या उपस्थितीत नाशिकच्या वसंत स्मृती भाजप कार्यालयात पराभूत उमेदवारांची बैठक होती. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे देखील नाशिकला आहेत. मात्र बैठकीकडे फिरकले नाहीत. १२ पैकी ३ पराभूत उमेदवार उपस्थित नाहीत. पक्षातील काही लोकांनी सहकार्य केले नाही. विरोधी भूमिका घेतली, अशी कबुली माजी मंत्री राम शिंदे यांनी दिली आहे, विखे यांना घेऊन फायदा नाही तोटा झाला, असंही वक्तव्य शिंदे यांनी केले. 

दरम्यान, अहमदनगरमध्ये भाजपला चांगले यश मिळाले नाही. याबाबत माजी मंत्री राम शिंदे यांनी सहमती दर्शविली. पक्ष याबाबत काय ती भूमिका घेईल. त्यावर विचार करेल असे सांगत, का पराभव झाला याचीही कारणेही पाहिली जातील. तसेच राधाकृष्ण विखे-पाटील यांचा तसा फायदा झाला नसल्याचेही म्हटले. ज्या भाजपच्या जागा होत्या त्याही आलेल्या नाहीत. उलट जागा कमी झाल्यात, असे थेट सांगत विखे-पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त केली.

अहमदनगरमध्ये भाजपच्या झालेल्या पराभवाला काँग्रेसमधून आलेले माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील जबाबदार आहेत, असा थेट आरोप  राम शिंदे  यांनी केला. ते ज्या पक्षात जातात, तिथं खोड्या करतात. त्या पक्षासाठी हानिकारक वातावरण निर्माण करतात, असा हल्लाबोल राम शिंदे यांनी केला. राज्यात भाजपच्या झालेल्या पराभवाची कारणमीमांसा करण्याचे काम सध्या सुरू आहे. उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आमदार आशिष शेलार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यानुसार, आज त्यांनी नाशिक येथे बैठक घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील पराभूत उमेवारांशी चर्चा केली आणि पराभवाची कारणं जाणून घेतली. या बैठकीला प्रा. राम शिंदे, शिवाजीराव कर्डिले, स्नेहलता कोल्हे आदी नेते उपस्थित होते. मात्र, एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे गैरहजर राहिल्यात.