बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्यांना लुटलं... 'फिल्मीस्टाईल' अटक

हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय

Updated: Aug 3, 2018, 05:13 PM IST

धुळे : धुळे शहरात गुंडानी धुमाकूळ घातला... परंतु, काही वेळातच पोलिसांनी त्यातल्या दोघांना बेड्या घातल्यात. 

शहरातील यल्लमा माता मंदिराजवळील मालेगाव रोडवरच्या न्यू प्रतिक दूध डेअरीवर तीन लुटारुंनी गोळीबार करून गल्ला लुटून नेला. ही लुटीची घटना भर रस्त्यावर असलेल्या डेअरीत रात्री नऊ ते साडे नऊ वाजताच्या सुमारास घडल्याने शहरात दहशतीचे वातावरण होतं. तीन तरुणांनी दोन बंदुकांचा धाक दाखवून गोळीबारही केला... आणि डेअरीच्या गल्ल्यात असणारी वीस ते तीस हजाराची रोकड पळवून नेली. काही कळण्याच्या आतच तिघेही ओमनी घेऊन पसार झाले.  

दोघांना अटक 

हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.. अवघ्या काही क्षणात ही लुटीची घटना घडली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ धाव घेऊन नाकाबंदी केली. सुदैवानं लुटारुंच्या गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नव्हतं. परंतु, या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होतं. 

लुटारू मनमाडमध्ये पोहचल्यावर तिघांमध्ये चोरीचे पैसे वाटण्यावरून वाद झाला. या वादानंतर तिघांपैकी एकानं त्याच्या साथीदारांच्या पायात गोळ्या मारल्या आणि पैसे घेऊन फरार झाला. पोलीस त्यांच्या मागावर होतेच... जखमी अवस्थेतल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.