राजीनामा द्या, मग OBC मंचावर जा; छगन भुजबळांना मंत्र्यांचा घरचा आहेर

महाराष्ट्रात छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील वाद पेटलाय. एकीकडं दोघांमधला संघर्ष वाढला असताना, छगन भुजबळांना महायुती सरकारमधल्या मंत्र्यांनीच घरचा आहेर दिलाय.

Updated: Nov 29, 2023, 09:47 PM IST
राजीनामा द्या, मग OBC मंचावर जा;  छगन भुजबळांना मंत्र्यांचा घरचा आहेर title=

Chhagan Bhujbal Controversy : मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मुद्यावर अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास भुजबळांनी विरोध केला. एवढंच नव्हे तर कुणबी नोंदी शोधण्यासाठी नेमलेल्या न्या. संदीप शिंदे समितीवरच त्यांनी आक्षेप घेतला. न्या. शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी भुजबळांनी केल्यानं सरकारमध्येच एकवाक्यता नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळं आता सरकारमधील ज्येष्ठ भाजप मंत्र्यानं थेट भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.

याआधी हसन मुश्रीफ आणि शंभूराज देसाई या मंत्र्यांनीही भुजबळांच्या मागणीला विरोध केला होता. आता विखे पाटलांनी थेट भुजबळांचा राजीनामा मागितल्यानं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांनी विखेंचं कौतुक केलं. तर, भुजबळांमध्ये राजीनामा देण्याची हिंमत नाही असा टोला मनोज जरांगेंनी लगावला आहे.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळू नये, यासाठी छगन भुजबळांनी ओबीसी मेळावे घेण्यास सुरूवात केलीय.. त्यामुळं मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण होईल की काय, अशी भीती व्यक्त केली जातेय. मंत्रीपदावर असलेल्या नेत्यांना जबाबदारीनं वागावं लागतं.  जातीय तेढ निर्माण होणार नाही, कायदा सुव्यवस्था धोक्यात येणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं असतं. मात्र भुजबळांना त्याचा विसर पडलेला दिसतो. त्यामुळंच पक्ष आणि सरकारमध्ये भुजबळ एकाकी पडल्याचं चित्र सध्या दिसतंय.

मनोज जरांगे विरूद्ध छगन भुजबळ असा संघर्ष पेटलेला असतानाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळांना अप्रत्यक्षपणे तंबी दिलीय. आरक्षणावरून वातावरण चिघळेल अशी प्रक्षोभक भाषणं करू नयेत अशा सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मंत्रिमंडळ बैठकीतून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे भुजबळांवर निशाना साधल्यांची चर्चा आहे. दरम्यान आपल्याला कुणी तंबी दिली नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलंय.  

जालन्याच्या सभेतून भुजबळांना उत्तर नाही, उत्तर देण्याएवढे भुजबळ मोठे नाहीत अशी टीका मनोज जरांगें यांनी केलीय. भुजबळ दोन जातीत तेढ निर्माण करतात असा आरोपही मनोज जरांगेंनी केलाय. मुख्यमंत्र्यांवर आपला पूर्णपणे विश्वास असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हंटलंय.

मनोज जरांगेंच्या चौथ्या टप्प्याच्या दौ-याच्या सुरुवात जालनातल्या सभेपासून 

लायकी शब्दावरून छगन भुजबळांनी जरांगेना घेरल्यानंतर आता जरांगेंच्या जालना येथील सभेच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल झालाय. जालन्यात 1 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची सभा होतेय.. 60 एकरवर होणारी ही सभा जिल्हा पातळीवरची सर्वात मोठी सभा असेल असा दावा संयोजकांनी केलाय.. या सभेसाठी 140 जेसीबींनी फुलांची उधळण होणार असून सभा सुरू होण्यापूर्वी 101 तोफांनी आतषबाजी केली जाईल. 50 हजार चौरस फूट जिल्ह्यात बॅनर लावण्यात आलेत.. शहर ते सभास्थळापर्यंत 10 हजार दुचाकींद्वारे मिरवणूक काढण्यात येणार आहे. 100 एकरवर वाहनतळाची जागा निश्चित करण्यात आलीये..आजपर्यंत जरांगे पाटील यांच्या सभेसाठीच्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज आणि मनोज जरांगे पाटील यांचेच छायाचित्र असायचे. सध्या वातावरण निर्मितीसाठी जे बॅनर आणि होर्डिंग लावले जातायत त्यावर सर्वच महापुरुषांची छायाचित्र आहेत. जालन्याच्या सभेतून धार्मिक आणि जातीय सलोखा कायम ठेवण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे संयोजकांनी म्हटलंय. त्यामुळे जालन्याच्या सभेतून जरांगेंचा पॅटर्न कसा बदलणार आणि ते कोणावर प्रहार करणार हेच पाहायचं.