अलिबाग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगडमधील जाहीर सभेत केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवण्यात आला. मोदी सरकारने सवर्णांना आरक्षण देताना गरिबांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. आयकर भरणाऱ्यांना आरक्षण दिले. हे सूटबुटवाल्यांचे सरकार आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. तर युती खड्ड्यात गेली सांगणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटायला सोफिटेल हॉटेलमध्ये नाक घासत का गेले होते, असा खोचक सल्ला जयंत पाटील यांनी केला. छगन भुजबळ यांनी यावेळी पंतप्रधान मोदींची नक्कल करत चांगलीच खिल्ली उडवली.
आता थांबायचे नाही. आता गप्प बसायचे नाही. जोपर्यंत राज्य आणि केंद्रातील सरकार उलथवून टाकायचे आहे. तोपर्यंत आपला लढा चालू ठेवायचा आहे. जी आश्वासने दिली त्यातील कोणतेही आश्वासने पूर्ण केलेले नाही. केवळ जुमलेबाजी करण्यात आली. आज बळी राजा संकटात आहे. मात्र, मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी काहीही करत नाही. कर्जमाफी करण्याची घोषणा राज्यातील भाजप सरकारने केली. मात्र, खरंच कर्जमाफी झाली आहे का? का कर्जमाफी झाली नाही. 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करणार, आले का? दोन कोटी युवकांना नोकऱ्या देणार. मात्र, अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात. महागाई कमी करु असे आश्वासन दिले. महागाई झाली का? सगळं खोटं बोलले जात आहे. जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्यात येत आहेत. केवळ खोट बोलण्यात येत आहे.
ज्यांना महिन्याला 66 हजार रुपये मिळतात त्यांना आरक्षण दिले. गरिबांना आरक्षण द्यायचं होते. मात्र, आठ लाख उत्पन्न असणाऱ्यांना आणि जे इन्कम टॅक्स भरतो, त्यांना आरक्षण दिले गेले आहे. म्हणजेच गरिबांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. हे सूटबूटवाल्यांचे सरकार आहे. तुमची दानत होती तर गरिबाला आरक्षण द्यायला हवे. जो दिवसभर काम करतो, दुष्काळ पडतो त्या शेतकऱ्याला चूल पेटवता येत नाही, त्यांना आरक्षण नाही. शेतकरी विरोधी सरकार आहे. तुम्हा-आम्हाला आणि देशाल लुबाडले, त्यांचे हे सरकार आहे. आता निवडणुका आल्या आहेत. तुम्हा तुम्हाला थापा ऐकायला मिळतील. मात्र, तुम्ही या भूलथापांना बळी पडू नका. राज्यातील मुख्यमंत्री म्हणतात 72 हजार नोकऱ्या देणार, अद्याप हाती काहीही नाही. केवळ थापाच. हे थापा मारणारे सरकार उलथवून टाका, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
सुनील तटकरे यांचा मागील निवडणुकीत 2100 मतांनी पराभव झाला. मोदींची लाट होती. त्यांच्या विचारांचे खासदार निवडून आलेत. मात्र, त्यांनी काय काम केले. साधा मुंबई - गोवा महामार्गाचे काम झाले काय? विकासकामांच्या नावाने बोंब आहे. जर रायगडची जागा राष्ट्रवादीला मिळाली तर येथून सुनील तटकरे यांना उमेदवारी मिळेल. त्यांच्यामाध्यमातून विकासकामांना चालना मिळेल. आमचे आघाडीचे सरकार होते, त्यावेळी कोकणाला भरभरुन दिले होते. मात्र, या सरकारने काय दिले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.