खाटेच्या स्ट्रेचरवरुन पायपीट करत हॉस्पिटल गाठले; आरोग्य सेविकेच्या तत्परतेमुळे आई आणि बाळ वाचले

रुग्णवाहिका पोहचणे अशक्य आहे हे लक्षात आले. यामुळे आरोग्य सेविकेने खाटेचे स्ट्रेचर बनवून गरोदर महिलेला रुग्णालयात नेले. 

Updated: Jul 17, 2023, 05:20 PM IST
खाटेच्या स्ट्रेचरवरुन पायपीट करत हॉस्पिटल गाठले; आरोग्य सेविकेच्या तत्परतेमुळे आई आणि बाळ वाचले title=

आशीष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली : एकीकडे भारत चांद्रयान मोहिमेच्या माध्यमातून गगणभरारी घेत आहे. तर, दुसरीकडे सर्वसामान्यांना आजही पायाभुत सुविधांअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचे भयाण वास्तव गडचिरोलीत पहायला मिळाले आहे.   भामरागड तालुक्यातील पेरमिली गावात गरोदर मातेला अचानक शेतातच  प्रसूतीकळा सुरू झाल्या. कंत्राटी आरोग्य सेविका सपना भुरसे यांनी रुग्णवाहिका शेतात येत नसल्याचे पाहून तातडीने मातेला खाटेचे स्ट्रेचर बनवून  आरोग्य केंद्रात नेले. आरोग्य सेविकेच्या तत्परतेने माता आणि बाळाचा जीव वाचला आहे. 

गडचिरोली जिल्ह्यातील ताडगाव शेतशिवारात एका कंत्राटी आरोग्य सेविकेच्या प्रसंगावधानाने गरोदर माता व बाळाचे प्राण वाचले आहेत. राजे अजय गावडे (वय 22) ही गरोदर महिला ताडगाव येथे आपल्या माहेरी आली होती. ती शेतात काम करत असतानाच तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. तिला वेदना सहन होत नसल्याने ती कसेबसे शेतातच असलेल्या आपल्या घरापर्यंत पोहोचली. याची माहिती ताडगाव प्राथमिक आरोग्य पथक येथे कार्यरत असलेल्या कंत्राटी आरोग्य सेविका सपना भुरसे यांना मिळाली. 

सपना यांनी तात्काळ तपासणी करत रुग्णालयात दाखल करण्याची वेळ ओळखली. अन्यथा बाळ आणि मातेचा जीव धोक्यात येणार होता. मात्र, दुचाकी वा रुग्णवाहिका गैरसोयीची होती. यातच आरोग्य सेविकेने शक्कल लढवत तत्परता दाखवली. गरोदर मातेला खाटेवर टाकून तब्बल एक ते दीड किलोमीटर पायपीट करून तिने प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एम. सातमवाड यांनी तसेच त्यांच्या चमूने गरोदर मातेची सुखरूप प्रसूती केली. माता आणि बाळ दोघेही सध्या सुखरूप असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

भीमा नदीकाठच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी होडीतून जीवघेणा प्रवास 

पंढरपूरमधील भीमा नदीकाठच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी होडीतून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. कान्हापुरीमधील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी भीमा नदी पार करून माळशिरस तालुक्यातील वाघोली गावात येतात. कान्हापुरी वाघोली दरम्यान नदीवर पूल उभारण्याची मागणी विद्यार्थ्यी करत आहेत.