रत्नागिरी : एसटी महामंडळ भरतीचा भोंगळ कारभाराचा फटका भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना बसलाय.
लेखी परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांना रत्नागिरी एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात बोलवण्यात आलं त्यानंतर मेडीकलसाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात देखील नेण्यात आलं. उमेदवारांची शासकीय रूग्णालयातून तपासणी देखील करण्यात आली.परंतु मेडीकल तपासणीसाठी लागणारी फी एसटी महामंडळाने जिल्हा शासकीय रूग्णालयात वेळेत न भरल्यामुळे गेल्या १८ सप्टेंबरपासून या उमेदवारांना सिव्हील रूग्णालयाच्या फे-या माराव्या लागत आहेत.
तीनशे उमेदवारांना मेडीकलसाठी एसटीविभागाने शासकीय रूग्णालयात पाठवलं खरं परंतू फक्त २१ उमेदवारांचे पैसे जिल्हा शासकीय रूग्णालयामध्ये भरल्यामुळे उर्वरित उमेदवार गेल्या सात दिवसांपासून जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या फे-या मारत आहेत. या भरतीसाठी बीड, उस्मानाबाद, यवतमाळ, अमरावती, अकोला, नागपूर याठिकाणाहून उमेदवार मोठ्या प्रमाणात आले आहेत.