रत्नागिरी : कोकणाला विस्तीर्ण अशी समुद्रकिनारपट्टी लाभली आहे. पुरातन मंदिरे आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांमुळे पर्यटकांची कायमच पसंती रत्नागिरीला असते. आता इथली कास पुष्पे रत्नागिरीच्या निसर्गसौंदर्यात अधिक भर घालत आहेत.
कोकणातल्या कातळावर फुलांचा जणू असा गालिचाच अंथरलाय. निळ्या, जांभळ्या आणि पिवळ्या फुलांनी मन कसं प्रसन्न होऊन जातं. हिरव्यागार मखमलींची चादर ओढून घेतलेल्या या काळ्या कातळावरच्या निळ्या, जांभळ्या आणि पिवळ्या रंगांचे हे पुष्प पावसाळ्यानंतर सर्वाधिक पहावयास मिळतात. गावाकडे या फुलांना वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. कातळावरील या निळया फुलांना सीतेची आसवं असंही नाव दिलं गेलंय.
कोकणात या फुलांना कातळावरील रानफुलं असं संबोधून याचं महत्त्व लक्षात घेतलं जात नाही. साता-यात कास पुष्प पठारानं पर्यटनाची क्रांती घडवलीय. त्याठिकाणी अशाप्रकारच्या जागा संरक्षित केल्या जातायत. त्याप्रमाणं कोकणातही ही पुष्प संरक्षित केले तर पावसाळी पर्यचनाला एक वेगळी दिशाच मिळू शकते.