मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. सगळ्यांचे सगळे पर्याय फेल गेले आहेत. सिंगल लार्जेस्ट पक्षही दावा करू शकलेले नाही. आमच्या सीएमचा शपथविधी शिवतीर्थावर होईल. एका पर्यायावर शेवटच्या टप्यात चर्चा आली आहे. तो मी नव्हेच, अशी लखोबा लोखंडेंची भूमिका घेतली आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी चर्चा थांबवली आहे. कर्नाटकात जे झालं ते महाराष्ट्राच चालणार नाही. रेसकोर्स, वानखेडे बूक केल्याची कागदपत्रे माझ्याकडे आहेत. खोटं बोलणारे लोकं चर्चेत अडथळा ठरत आहेत. अमित शहा का बोलत नाहीत, हे रहस्य आहे. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देतांना भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलं की, 'आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांनी युतीचा फॉर्म्युला ठरवलेला आहे. त्याचंच पालन शिवसेनेकडून व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. त्यांनी एक पाऊल पुढे टाकून चर्चा करावी. जनतेने युतीला बहुमत दिलं आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर काही बोलता येणार नाही. ते काय डोळ्यासमोर ठेवून बोलतात ते कळत नाही.'
'एकत्र बसून शिवसेना-भाजप युतीचा मुख्यमंत्री व्हावा अशी आमची भूमिका आहे. गेली ५ वर्ष राज्यात आमचं सरकार आहे. आम्ही जो शब्द दिला तो आम्ही पाळला आहे. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण यासह आम्ही दिलेले शब्द पाळले आहेत. महाराष्ट्र आणि हरियाणा येथील पेश यामध्ये फरक आहे. राज्यातील नेते प्रश्न हाताळत आहे तोपर्यंत केंद्रातील नेते राज्यात लक्ष घालणार नाहीत. जेव्हा वाटेल की, हा प्रश्न हाताळण्या बाहेर जात आहे. त्यावेळी केंद्रातील नेते लक्ष घालतील.' असं देखील रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.