१२ रुपयांत पोटभर जेवण देणाऱ्या पुण्याच्या झुणका-भाकर केंद्राचं स्थलांतर

कष्टकऱ्यांचं पोट भरणारं झुणका-भाकर केंद्र विस्थापित

Updated: Nov 2, 2019, 09:51 PM IST
१२ रुपयांत पोटभर जेवण देणाऱ्या पुण्याच्या झुणका-भाकर केंद्राचं स्थलांतर title=

अरुण मेहेत्रे, झी २४ तास, पुणे : पोटापाण्यासाठी पुण्यात आलेल्या कष्टकऱ्यांचा आधार म्हणजे मंडई मंडळाच झुणका-भाकर केंद्र. गेली 45 वर्षे गोरगरिबांची अविरतपणे भूक भागवणारे हे झुणका भाकर केंद्र आता नवीन जागेत स्थलांतरित होत आहे.

अवघ्या पन्नास पैशांत पिठलं भाकरीचं पोटभर जेवण... 72 च्या दुष्काळात यापेक्षा मोठं पुण्यकर्म ते काय? उदरनिर्वाहासाठी पुण्यात आलेल्या कष्टकऱ्यांना दोन घास सुखाचे मिळावेत यासाठीचा हा उपक्रम. पुण्यनगरीचे तत्कालीन महापौर दिवंगत आप्पा थोरात यांच्या पुढाकारातून हे झुणका भाकर केंद्र सुरू झालं. अखिल मंडई मंडळानं पुढे हा उपक्रम मनोभावे चालवला. आजवर अनेक मान्यवरांनी या झुणका-भाकर केंद्राला भेट दिली. इतकंच नाही तर इथल्या जेवणाचा आस्वादही घेतलाय.

मंडईतलं हे झुणका भाकर केंद्र खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील पहिलं झुणका-भाकर केंद्र म्हणता येईल. १९९५ मध्ये युती सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेल्या झुणका-भाकर केंद्रांची प्रेरणा हीच. आजही इथे अवघ्या १२ रुपयांत पोटभर जेवण मिळतं. पण आता मंडईमधल्या मेट्रो स्टेशनसाठी हे झुणका भाकर केंद्र स्थलांतरित करावं लागणार आहे.

गरिबांसाठी १० रुपयांची थाळी अशी आश्वासनं निवडणुकीच्या निमित्ताने दिली जातात. या आश्‍वासनांच काय होतं हे आपल्याला माहितीच आहे. अशा परिस्थितीत एका गणपती मंडळाचा सामाजिक उपक्रम खरोखरच कौतुकाला पात्र असा आहे.