मुंबई : Rajya Sabha elections: Fight in Mahavikas Aghadi :राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच दिसून येत आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेचा दावा आहे. चार जागा निवडणून आणण्याएवढी मविआकडे मते आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी शिवसेनेला मदत करणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीने जादाची मते अपक्ष निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले संभाजी राजे यांना देण्याचे जाहीर केले. तसेच त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे आघाडीत नवा पेच निर्माण झालाय.
राज्यसभेसाठीची तिसरी जागा भाजपने लढवल्यास फोडाफोडी करावी लागणार आहे. त्यातच संभाजीराजे यांनी सहावी जागा अपक्ष लढवण्याचं जाहीर केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आपलं मत संभाजीराजेंच्या पारड्यात टाकते की शिवसेनेला मदत करणार याची उत्सुकता आहे. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार आहे. महाविकास आघाडीकडे चार जागा जिंकून येऊन शकतात एवढी मते आहेत. मात्र, महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेनेला मदत करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे.
तर विरोधी पक्ष भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते. संख्याबळानुसार शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. तिसरी जागा भाजपने लढवल्यास मोठी चुरस होण्याची शक्यता आहे.