'8 दिवसांत पूरग्रस्तांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा जलसमाधी घेणार', राजू शेट्टी यांचा निर्वाणीचा इशारा

महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे

Updated: Aug 23, 2021, 05:43 PM IST
'8 दिवसांत पूरग्रस्तांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा जलसमाधी घेणार', राजू शेट्टी यांचा निर्वाणीचा इशारा title=

कोल्हापूर : आठ दिवसात राज्य सरकारनं मागण्या मान्य न केल्यास जलसमाधी घेणार असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. राज्यातील सरकारनं पूरग्रस्त शेतकर्‍यांची घोर फसवणूक केली आहे, आता सरकारला शेतकर्‍यांसमोर गुडघे टेकायला भाग पाडू असंही राजू शेट्टी यांनी म्हंटलं आहे. 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं पूरग्रस्तांसाठी साडे बारा हजार कोटींची मदत जाहीर केली. त्यापैकी शेतीसाठी फक्त 500 कोटी रुपये देवून राज्य सरकारनं शेतकर्‍यांची घोर फसवणूक केलीय. साडे अकरा हजार कोटी कुणाच्या घशात घालणार आहात हे सांगावं असंही राजू शेट्टींनी म्हंटलं आहे. 

महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. हे निकष बदलावे आणि तातडीने शेतकऱ्यांना भरीव मदत करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी राजू शेट्टी यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.

सरकारने घेतलेला शासन निर्णय बदलून महापूरामुळे पूर्णपणे बुडित झालेल्या पिकावरील कर्ज पूर्ण माफ करणं, तसंच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान जे पूर्वी सरकारने जाहीर केलं आहे, दे देण्यात यावं, आणि विनाअट पुनर्वसन करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, अशा मागण्या राजू शेट्टी यांनी केल्या आहेत. मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. 

राजू शेट्टी यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली आहे. भाजपनेही शेतकऱ्यांना मदत केलेली नाही, इतका मोठा पूर येऊनही एनडीआरएफचं पथक याठिकाणी आलं नाही, मग राष्ट्रीय आपत्कालीन मदत फक्त गुजरात पूरती आहे का? त्याचा महाराष्ट्रासाठी वापर होणार नाही का? असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

भाजप असो किंवा राज्य सरकार असो दोघंही शेतकऱ्यांची फसणूक करत आहेत, आणि म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत अशी भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली आहे.