...अन् 10 हजारांची खेळणी घेऊन राज ठाकरे 'या' 12 वर्षीय पुणेकराच्या घरी पोहोचले

Raj Thackeray Meets 12 Year Old Pune Boy: राज ठाकरेंनी पुणे दौऱ्यावर असतानाच स्वत: येथील स्थानिक नेत्यांना आपण या मुलाला भेटायला बुधवारी जाणार असल्याचं एक दिवस आधी सांगितलं होतं. त्यानंतर राज खरोखरच या 12 वर्षीय पुणेकराला भेटायला थेट त्याच्या घरी पोहोचले.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 24, 2023, 04:34 PM IST
...अन् 10 हजारांची खेळणी घेऊन राज ठाकरे 'या' 12 वर्षीय पुणेकराच्या घरी पोहोचले title=
राज ठाकरेंनी या मुलाबरोबर 15 मिनिटं गप्पा मारल्या

Raj Thackeray Meets 12 Year Old Pune Boy: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी अचानक एका चिमुकल्याची थेट त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. पिंपरी-चिंडवडमधील दापोडी येथील एका कार्यकर्त्याच्या घरी राज ठाकरे अचानक पोहोचले. विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे त्यांच्या भोवती कार्यकर्त्यांचा गराडा नव्हता. त्यांनी या चिमुकल्यासाठी तब्बल 10 हजार रुपयांची खेळणी आणि चॉकलेट आणले होते.

कोण आहे हा मुलगा?

राज ठाकरेंनी ज्या मुलाला भेट दिली त्याचं नाव आहे राज देशपांडे.  राज देशपांडे हा केवळ 12 वर्षांचा असून तो मागील अनेक वर्षांपासून मनसेचे कार्यकर्ते असलेल्या विशाल देशपांडेंचा मुलगा आहे. विशाल हे पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षाचालक म्हणून काम करतात. राज देशपांडेला स्नायूंसंदर्भातील दुर्धर आजार आहे. हा छोटा राज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मोठा चाहता आहे. "मागील अनेक वर्षांपासून माझा मुलगा मला विचारायचा की मला राज ठाकरेंबरोबर हॅण्डशेक करण्याची संधी मिळेल का. मनसेचे नेते किशोर शिंदे आणि सचिन चिकलेंच्या माध्यमातून मी माझ्या मुलाची इच्छा राज ठाकरेंना कळवली," असं विशाल देशपांडेंनी 'द इंडियन एक्सप्रेस'शी बोलताना सांगितलं.

अर्धा तास केली 10 हजारांची शॉपिंग

राज ठाकरे हे काही दिवसांपूर्वी पुण्याच्या दौऱ्यावर होते. पक्षासंदर्भातील कामं आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या लग्नांना हजेरी लावण्यासाठी ते पुण्यात आले होते. त्यांनी याच दौऱ्यादरम्यान आपण विशाल देशपांडेंच्या मुलाची बुधवारी थेट घरी जाऊन भेट घेऊन असं राज यांनी मनसेच्या स्थानिक नेत्यांना कळवलं. विशाल देशपांडेंच्या घरी जाताना राज यांनी अर्धा तास या चिमुकल्यासाठी शॉपिंग केली. राज ठाकरेंनी तब्बल 10 हजार रुपयांची खेळणी आणि चॉकलेट्स या चिमुकल्यासाठी विकत घेतल्याची माहिती मनसेच्या नेत्यांनी दिली. 

भेटीत काय घडलं?

विशाल देशपांडेच्या घरी पोहोचल्यानंतर राज ठाकरेंनी राज देशपांडेला मिठी मारली. त्यांनी राजच्या तब्बेतीची चौकशी केली. राज ठाकरेंना घरी आल्याच पाहताच छोट्या राज देशपांडेने त्यांचे आभार मानले. "तुम्हाला प्रत्यक्षात भेटण्याची माझी मागील अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. मी तुम्हाला टीव्हीवर आणि सोशल मीडियावर पाहतो. तुम्ही मला भेटलात यासाठी मी तुमचे फार आभार मानतो," असं राज देशपांडे मनसे अध्यक्षांना म्हणाला. तुमच्या नावावरुनच माझ्या वडिलांना माझं नाव राज असं ठेवलं आहे अशी माहितीही त्याने राज ठाकरेंना दिली. राज देशपांडेने राज ठाकरेंना एक पेन भेट म्हणून दिलं.

दोघांमध्ये काय गप्पा झाल्या?

राज ठाकरे विशाल देशपांडेच्या घरी 15 मिनिटं होते. त्यांनी राज देशपांडेशी बऱ्याच गप्पा मारल्या. त्याला कोणता आजार झाला आहे, काय त्रास होतो, कशी या आजाराशी झुंज देतोय, आई-वडील काय काम करतात यासारखे प्रश्न राज यांनी राज देशपांडेला विचारले. मनसे अध्यक्षांनी राज देशपांडेला हवी ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं. "कोणतीही राजकीय चर्चा यावेळी झाली नाही. केवळ देशपांडे कुटुंबाला नाही तर संपूर्ण दापोडीला आनंद झाला आहे. आम्ही हे क्षण कायम लक्षात ठेऊ," असं स्थानिक मनसे कार्यकर्ता असलेल्या कैलास जाधवने सांगितलं.

त्याचं स्वप्न पूर्ण झालं

"माझ्या मुलाला स्नायूंसंदर्भातील आजार असल्याचं 3 महिन्यांपूर्वीच समजलं. तेव्हापासूनच त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तो अनेकदा मला मस्करीमध्ये मी पक्षासाठी काम करत असूनही राज यांची भेट घालून देत नसल्यावरुन टोमणा मारायचा. आज त्याचं स्वप्न पूर्ण झालं," असं विशाल देशपांडेंनी या भेटीनंतर म्हटलं.