मुंबई : सध्या मान्सूनचा प्रवास लांबला असला तरीही, राज्यात मात्र काही ठिकाणी पावसाची रिमझिम बरसात सुरु झाली आहे. हवामान खात्याच्या सांगण्यानुसार हा मान्सून नसून मान्सूनपूर्व पाऊस असल्याचं सांगण्यात आलं आहे. (rainshowers Monsoon rain update mumbai maharashtra konkan )
राज्यात पुढील तीन दिवस ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. किंबहुना राज्याच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे.
कोकण आणि गोवा पट्टय़ात २८ मेपर्यंत काही भागात तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता जूनच्या पहिल्या आठवडय़ात र्नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील. त्यानंतर कोकणमार्गे महाराष्ट्र आणि मुंबई परिसरात हे वारे पोहोचतील.
कुठे अडकला मान्सून...
अंदमानपासून सुरु झालेला पावसाचा प्रवास पुढे अरबी समुद्रात आला आणि तिथेच अडकून पडला. प्रतिकूल स्थितीमुळे मान्सून श्रीलंकेच्या किनारपट्टीसह परिसरात अडकला आहे. मान्सूनचे वारे २७ मे रोजी भारतात दाखल होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. ज्यामुळं आता कोकणासह मुंबई रोखानं मान्सूनचा प्रवास जून महिन्यापर्यंत पुढे गेला आहे.