रायगड : Rain in Raigad : कालच्या मुसळधार पावसानंतर आज रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर खूपच कमी झाला आहे. जिथे पुराचा धोका होता त्या महाड पोलादपूर परिसरात परिस्थिती सामान्य आहे. महाडच्या दस्तुरी नाक्यावरील पाणी ओसरले आहे. आकाशात काळया ढगांची दाटी झाली आहे.
रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असली तरी त्या इशारा पातळीच्या खालून वाहतायत. मात्र हवामान खात्याने पुढील 4 दिवस रायगड जिल्ह्यात ऑरेंज कायम ठेवला आहे.
रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. महाड येथील पूरस्थितीने नागरिक भयभीत झालेत. आज पावसाने थोडी उसंत घेतल्याने पूर ओसरत आहे.#Rain #Raigad #Mahad pic.twitter.com/FbEFhjYLgB
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 5, 2022
सर्व यंत्रणा सज्ज आहेत. महाडमध्ये एनडीआरएफची टीम तैनात आहे. दरडी कोसळणे किंवा पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेवून जवळपास 1400 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आले आहे.
काल झालेल्या मुसळधार पावसामुळे महाड जवळ डोंगरात वसलेल्या गांधार पाले गावात पाणीच पाणी झालं होतं. मुंबई गोवा महामार्गाचं रुंदीकरण करताना मोरीचं काम चुकीच्या पद्धतीनं करण्यात आलं. त्यामुळे डोंगरातून नैसर्गिक नाल्याद्वारे येणारं पाणी खाली वाहून न जाता उलटे फिरत आहे. त्यामुळेच गावात पाणी शिरल्याचा आरोप ग्रामस्थानी केला आहे.