विशाल पडाळे, झी मीडिया, लोणावळा : लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसरात अतिवृष्टी झालीये. मागील २४ तासांपासून या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे.
पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. मागील २४ तासात लोणावळा शहरात एकूण २२० मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आलाय. जोरदार पावसामुळे शहराच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आहे. शहरातील बरेच रस्ते पाण्याखाली गेले असून लोणावळ्यातून जाणारा एक्सप्रेस हायवे तसेच नॅशनल हायवेही पावसामुळे मंदावला आहे.
आजूबाजूच्या ग्रामीण परिसरालाही या पावसाचा फटका बसला असून कामशेत येथील आतील ग्रामीण पट्ट्याला जोडणारा इंद्रायणी नदीचा पूल पाण्याखाली गेलाय. मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून सातत्याने पडत असलेल्या या पावसामुळे शहरातील तसेच परिसरातील धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालीय.
शहरातील भुशी डॅम पूर्ण भरले असून भुशी धरणातून ओव्हरफ्लो होणाऱ्या पाण्याचा वेग वाढल्याने तसेच त्याबाजूला जाणारे रस्ते पाण्याखाली गेल्याने धरणाच्या परिसरात तसेच पायऱ्यांवर जाण्यास पर्यटकांना प्रतिबंध करण्यात आला आहे. तशा सूचना पोलीस प्रशासनाकडून ध्वनिप्रक्षेपका द्वारे पर्यटकांना देण्यात येत आहेत.
याशिवाय तुंगार्ली धरण हे त्याच्या पूर्ण क्षमतेने भरत आलं असून वलवण धरण, शिरोता धरण, उकसान धरण, ठोकळवाडी, अन्द्रा धरण तसच लोणावळा धरणाचा पाणीसाठाही कमालीचा वाढला आहे... तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारं पवना धरण ८२ टक्क्यांहून अधिक भरले आहे.