मुंबई : Rain in Maharashtra : राज्यात पुन्हा एकदा धो धो पाऊस कोसळणार आहे. (Maharashtra Rain) गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. काल संध्याकाळी विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला. कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. या पावसाचा पुन्हा जोर वाढणार आहे. (Rain alert in Maharashtra ) आता भारतीय हवामान विभागाने राज्यात तब्बल 31 जिल्ह्यांत यलो अलर्ट तर 2 जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच सतर्क राहण्याची सूचना करण्यात आल्या आहेत.
पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तब्बल 31 जिल्ह्यांत यलो अलर्ट तर 2 जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे आणि रायगडमध्ये मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ठाणे, रायगड जिल्ह्यांतील निर्जन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पालघर, पुणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा पुढील तीन ते चार तासात जोरादर पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही घराबाहेर पडताना खबरदारी घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.
कल्याणमध्ये पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचं अक्षरशः तांडव पाहायला मिळालं..मुसळधार पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुख्य बाजारपेठेत आणि स्टेशन परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरले. ठाण्यातील कळवा आणि मुंब्रा भागात पावसानं जोरदार हजेरी लावली होती.. रेती बंदर राणानगर या बोगद्याजवळ पाणी भरल्यानं प्रवाशांचे हाल झाले.
दुसरीकडे सिंधुदुर्गात नांदगावमधल्या संतापलेल्या नागरिकांनी मुंबई - गोवा महामार्गावररची वाहतूक रोखून धरली होती. पावसाचं पाणी घरांमध्ये शिरल्यानं, स्थानिक आक्रमक झाले. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण करताना ठेकेदारानं चुकीच्या पद्धतीनं गटारांचं बांधकाम केलं. त्यामुळे पावसाळ्यात नांदगावात पाणी शिरून घरांचं नुकसान होत आहे.
मुंबई बंगळूरू राष्ट्रीय महामार्गवरील ताथवडे भुयारी मार्गात पावसाचं पाणी मोठया प्रमाणावर साचल्यानं वाहतूक ठप्प झाली होती. नागरिकांनी साचलेल्या पाण्यातून खड्ड्यांचा अंदाज घेत जीवाघेणा प्रवास केला.
रायगडमधल्या पेण तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर पेण शहर आणि तालुक्यातील अनेक गावात पाणी साचलं. मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या गडब गावातला नाला ओसंडून वाहू लागला. त्याला नदीचे स्वरूप आलं होतं. या नाल्याचं पाणी अनेक घरांत शिरलं. अनेक वाहनं पाण्यात अडकून पडली होती.
सातारा शहरासह आजूबाजूच्या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. लिंब गोवे परिसरातील ओढे, नाल्यांना पूर आला. तर अनेक ओढ्यांवरील पूल पाण्याखाली गेले. काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं. अनेकांच्या शेतांमध्ये पाणी साचलं.
भंडारा जिल्ह्यात पावसानं तुफान हजेरी लावली. भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाकडून येलो अलर्ट दिलाय.. पुढील तीन दिवस पावसाचे संकेत हवामान खात्याने दिलेत. दरम्यान येणारा पाऊस धान पिकाला पोषक ठरणारा असून या पावसानं बळीराजा सुखावला आहे.