रायगड लोकसभा लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?

कधीकाळी काँग्रेस आणि शेकापच्या पदरात आलटून पालटून दान टाकणाऱ्या रायगड लोकसभा मतदारसंघानं गेल्यावेळी शिवसेनेला साथ दिली. कधीही लाटेवर स्वार न होणारा मतदारसंघ अशी रायगड मतदारसंघाची ओळख.

Updated: Jun 27, 2018, 07:54 PM IST
रायगड लोकसभा लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार? title=

रत्नागिरीहून प्रणव पोळेकरसह प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : कधीकाळी काँग्रेस आणि शेकापच्या पदरात आलटून पालटून दान टाकणाऱ्या रायगड लोकसभा मतदारसंघानं गेल्यावेळी शिवसेनेला साथ दिली. कधीही लाटेवर स्वार न होणारा मतदारसंघ अशी रायगड मतदारसंघाची ओळख. रायगड, राजधानी मुंबईपासून जलमार्गानं अधिक जवळचा असलेला हा मतदारसंघ.. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड तर रत्नागिरी जिल्हयातील दापोली आणि गुहागर अशा ६ विधानसभा मतदारसंघांचा मिळून तयार झालेला रायगड लोकसभा मतदारसंघ. 

२००९ च्या पुनर्रचनेआधी कुलाबा नावानं ओळखला जाणारा हा मतदारसंघ. इथं काँग्रेस विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष असा सामना रंगायचा... या मतदारसंघानंही प्रत्येकवेळी रंग बदलत कधी काँग्रेसला, तर कधी शेकापला आलटून पालटून साथ दिली.

१९८९ ते १९९६ पर्यंत सलग तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसचे बॅ. ए. आर. अंतुले यांनी शेकापचे अॅड. दत्ता पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर दोनवेळा शेकापचे रामशेठ ठाकूर निवडून आले. २००४ च्या निवडणुकीत बॅ. अंतुले पुन्हा खासदारपदी विजयी झाले. इतिहास पाहिला तर हा मतदारसंघ कधीच लाटेवर स्वार झाला नाही. 

१९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या निधनानंतर राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात काँग्रेसनं मोठं यश मिळवलं... परंतु कुलाबा मतदारसंघ त्यावेळी शेकापबरोबर राहिला. अगदी गेल्या २०१४ च्या निवडणुकीत देशात मोदी लाट असतानाही शिवसेनेचे अनंत गिते जेमतेम २ हजार ११० मतांनी विजयी झाले. गिते यांना ३ लाख ९६ हजार १७८ मते मिळाली, तर तटकरे यांना ३ लाख ९४ हजार ६८ मते मिळाली. शेकापचे रमेश कदम तिसऱ्या स्थानावर फेकले गेले.

गेल्या निवडणुकीत रायगडमध्ये शिवसेना भाजप युती, शेकाप आणि कॉंग्रेस– राष्ट्रवादी आघाडी अशी तिरंगी लढत झाली. गेल्या शेकापच्या वतीनं निवडणूक लढवणारे रमेश कदम आता राष्ट्रवादी, भाजपमार्गे काँग्रेसमध्ये डेरेदाखल झालेत. याआधी एकमेकांना पाण्यात पाहणारे सुनील तटकरे आणि शेकापचे जयंत पाटील हे एकत्र आलेत. 

जिल्हा परिषदेची सत्ताही त्यांचाकडंच आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले हे एकमेव आमदार आहेत. राष्ट्रवादीचे ३ तर शेकापचे २ आमदार आहेत. या मतदारसंघात भाजपची अवस्था दखल घेण्याजोगीही नाही, तर अंतुले यांच्यानंतर कॉंग्रेसला इथं तारणहार सापडलेला नाही.

गेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी सुनील तटकरे यांच्यावर जलसंपदा विभागातील भ्रष्टाचारांच्या आरोपांची राळ उठली होती. शेकापचे जयंत पाटील यांनी त्यांच्याविरोधात आघाडीच उघडली होती. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले तटकरे यांच्या घरातच तीन आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष आहे. त्यामुळं राष्ट्रवादी कागदावर मजबूत वाटत असली तरी तटकरेंच्या घराणेशाहीच्या राजकारणाला कंटाळून त्यांचे अनेक जवळचे सहकारी पक्ष सोडून शिवसेनेत सामील झालेत. खुद्द तटकरे यांनाही भाऊबंदकीनं ग्रासलंय. 

माजी आमदार मधुकर ठाकूर आणि माजी मंत्री रवीशेठ पाटील तटकरेंच्या राजकारणाचे बळी ठरलेत. अशावेळी सुनील तटकरे पुन्हा निवडणूक लढवतील की नाही हा प्रश्नच आहे. तटकरे निवडणूक लढवणार नसतील तर ही जागा लढवायची तयारी कॉंग्रेसने दाखवलीय.

सलग सहाव्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले अनंत गिते केंद्रात अवजड उद्योग खात्याचे मंत्रीपद सांभाळत आहेत... त्यांची प्रतिमा चांगली असली तरी मंत्री म्हणून ते फारसा प्रभाव पाडू शकलेले नाहीत. 

नियमित बैठका आणि खासदार निधी संपवण्यापलीकडं त्यांचं काहीच काम दिसत नाही. त्यामुळं शिवसैनिकही त्यांच्यावर नाराज आहेत. या मतदारसंघात कुणबी मतांचं प्राबल्य आहे. एरव्ही कुठल्याही पक्षाशी बांधिलकी सांगणारे कुणबी मतदार लोकसभेला मात्र आपला माणूस म्हणून गीतेंच्या पाठीशी उभे राहतात.

कुठल्याही एका पक्षाची मक्तेदारी न सांभाळणारा रायगड लोकसभा मतदारसंघ वर्षभरात कुणाच्या बाजूने झुकतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

काय आहेत रायगड लोकसभा मतदारसंघाच्या समस्या

रायगड लोकसभा मतदारसंघाला अनेक समस्यांनी ग्रासलंय. काय आहेत रायगडवासीयांच्या समस्या आणि खासदार अनंत गिते यांनी गेल्या ५ वर्षांत काय केलं, पाहा...

रायगड... मुंबईला लागून असलेला जिल्हा. या जिल्हयाचा काही भाग हा मुंबईचं उपनगर होवू पाहतंय. परंतु नागरी समस्यांबरोबरच इतरही समस्या या जिल्हयाला भेडसावत आहेत. औद्योगिकीकणामुळं नागरीकरण वाढलंय. पण त्याप्रमाणात सुविधा वाढत नाहीत. उद्योगांसोबत आलेल्या प्रदुषणाची समस्या गंभीर होत चाललीय. मुंबई गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं रूंदीकरण ७ वर्षांपासून रखडलंय. तर दुसरीकडं कोकण रेल्वेचा इथल्या प्रवाशांना काडीचाही उपयोग होत नाही .

औद्योगिकीकरण वाढले असले तरी तिथं परप्रांतीयांचाच भरणा अधिक आहे. इथला तरूण नोकरीसाठी आजही मुंबईकडे धावतोय. अनेक उद्योग बंद पडताहेत. पर्यटनवाढीला चालना देणाऱ्या योजना नाहीत. वडिलोपार्जित जमिनी विकून तिथंच काम करण्याची वेळ इथल्या तरूणाईवर आलीय...
 
आरसीएफ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न कायम आहे. पेण ते अलिबाग रेल्वेजोडणी प्रलंबित आहे. अनंत गीते यांच्याकडे केंद्रातील अवजड उद्योग खात्याचे मंत्रीपद आहे. कोकणात एखादा तरी उद्योग येईल, अशी इथल्या तरूणांची अपेक्षा होती. परंतु शासनाच्या धोरणामुळे ती सपशेल फोल ठरलीय .

सारे राजकारणी एकाच माळेचे मणी अशी इथल्या नागरीकांची भावना झालीय. या समस्यांच्या गर्तेतून बाहेर काढणारा तारणहार आपल्याला मिळेल का याच्या प्रतिक्षेत रायगडवासीय आहेत.