अर्णब न्यायालयीन कोठडीला रायगड पोलिसांचे आव्हान, सुनावणी होणार ७ नोव्हेंबरला

अलिबाग न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना सुनावलेल्या न्यायालयीन कोठडीला रायगड पोलिसांनी सत्र न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्जाद्वारे आव्हान दिले आहे.

Updated: Nov 5, 2020, 06:12 PM IST
अर्णब न्यायालयीन कोठडीला रायगड पोलिसांचे आव्हान, सुनावणी होणार ७ नोव्हेंबरला  title=

रायगड : अलिबाग न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना सुनावलेल्या न्यायालयीन कोठडीला रायगड पोलिसांनी सत्र न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्जाद्वारे आव्हान दिले आहे. ७ नोव्हेंबरला त्यावर सुनावणी होणार आहे. अर्णब यांना अटक केल्यानंतर पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी पोलीस कोठडी नाकारत, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याप्रकरणी रायगड पोलिसांनी सत्र न्यायालयात पुनर्निरीक्षण याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे अलिबाग न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज अर्णब गोस्वामींनी मागे घेतला आहे. 

रिपब्लिक टीव्हीचे मालक आणि संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. तसेच फिरोज शेख, नितेश सारडा यांनाही अटक केली आहे. दरम्यान, अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहीली होती. त्या चिठ्ठीत रिपब्लिकचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरजा यांच्यामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते. त्यांनी आपले कामाचे पैसे दिलेले नाही, असे आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहीले होते.

अन्वय नाईक यांनी रिपब्लिकन वाहिनीसाठीच्या स्टुडिओचे काम केले होते.  स्टुडीओच्या इंटेरियर डिझाईनच्या कामाची जबबाबदारी त्यांच्यावर होती. यासाठी ५  कोटी ४० लाख इतके बिल अर्णब गोस्वामी यांच्याकडून येणे होते. पण, वारंवार बिल मागूनही गोस्वामींकडून बिलाची रक्कम दिली गेली नाही. त्यामुळे मानसिक तणावाखाली अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी नाईक यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या आत्महत्येस अर्णब तसेच  फिरोज शेख, नितेश सारडा यांना जबाबदार धरले होते. तसेच त्यांच्या आईने देखील आत्महत्या केली आहे.  या घटनेसंदर्भात अन्वय नाईक यांच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.  रायगड पोलिसांकडून कलम ३०६ अन्वये गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.