प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून जगभरात किर्ती असलेल्या किल्ले रायगडावर उत्खननातून खरी दौलत सापडण्यास सुरूवात झालीय. यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. किल्ले रायगड...छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडच्या संवर्धनासाठी शासनाने ६०० कोटी रुपयांचा आराखडा तयार केलाय..याची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या अध्यक्षतेखाली एका स्वतंत्र प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात आली.
शिवकालीन वस्तू सापडल्या
भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्व परवानगी घेऊन संवर्धनाच्या कामाला सुरूवात करण्यात आली. सध्या रायगडावर काही ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने उत्खनन करण्यात येत आहे. त्यामध्ये अनेक शिवकालीन वस्तू सापडल्यात. शिवकालीन शस्त्रांचे अवशेष, शिवकालीन नाणी, त्याकाळात वापरल्या जाणा-या बंदूकीतील गोळी, तोफेचे अवशेष, नक्षीदार मातीची मटकी, चीनी मातीच्या भांड्याचे तुकडे, त्याकाळातील विटा, कौलं त्याचबरोबर तोफगोळे हाती लागल्याचे किल्ले रायगड संवर्धन प्राधिकरण अध्यक्ष खा. संभाजीराजे यांनी सांगितले.
ऐतिहासिक वास्तूंचं जतन आणि संवर्धन
पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये पुरातत्त्व शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या १० विद्यार्थ्यांचा चमू इथं गेले १५ दिवस काम करतोय. काही मोजकीच ठिकाणं निवडण्यात आली असून उत्खननासाठी केवळ कुदळ, फावडी याच अवजारांचा वापर करण्यात आला आहे. उत्खननाबरोबरच इथल्या ऐतिहासिक वास्तूंचं जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचे किल्ले रायगड संवर्धन प्राधिकरणाचे सदस्य रघुजीराजे आंग्रे यांनी सांगितले. स्वतंत्र प्राधिकरणाच्या निर्मितीनंतर आता किल्ले रायगड कात टाकत असल्याचं चित्रं निर्माण झालंय. यामुळे इतिहासाचा ठेवा जपला जाणार आहे.