राहुल गांधींकडे खातेवाटपाचा निर्णय, काँग्रेस आणखी खात्यांची करणार मागणी

राज्यातल्या खातेवाटपाचा निर्णय दिल्लीत

Updated: Dec 31, 2019, 05:01 PM IST
राहुल गांधींकडे खातेवाटपाचा निर्णय, काँग्रेस आणखी खात्यांची करणार मागणी title=

नवी दिल्ली : राज्यातल्या खातेवाटपाचा निर्णय दिल्लीत राहुल गांधी घेणार आहेत. दिल्लीत राहुल गांधींच्या निवसस्थानी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची बैठक झाली. त्यामुळे काँग्रेसच्या खातेवाटपाचा निर्णय आजच होण्याची शक्यता आहे. तसंच या बैठकीत काँग्रेसला अजून खाती मिळावी अशी भूमिका मांडण्यात आली. त्यामुळे आणखी खाती मिळण्यासाठी बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे नेते आधी चर्चा करतील, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुढची चर्चा करणार असल्याची माहिती मल्लिकार्जुन खर्गेंनी दिली आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, सी. वेणूगोपाल, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि सर्व मंत्री या बैठकीला हजर होते. काँग्रेसच्या मंत्र्यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीचीही भेट घेतली.

राज्यात सोमवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. विधिमंडळाच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ३६ आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ज्यामध्ये काँग्रेसच्या आठ जणांनी कॅबिनेट आणि दोन जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी झाला असला तरी खातेवाटप अजून बाकी आहे. कोणत्या नेत्याला कोणतं खातं मिळणार याबाबत कार्यकर्ते, नेते आणि लोकांमध्ये ही उत्सुकता आहे.

काँग्रेसच्या कोणत्या मंत्र्यांला कोणतं खातं दिलं जावं याचा निर्णय हे राहुल गांधी हे घेणार आहेत. त्यामुळे काँग्रेसची ही यादी आल्यानंतरच खातेवाटपाचा निर्णय होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. बाळासाहेब थोरात आज दिल्लीहून राज्यात आल्यानंतर याबाबतचा पुढचा निर्णय घेतला जाणार आहे.