Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात सुरू असलेली भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. राहुल गांधी सध्या वाशिम (Washim) जिल्ह्यात आहे. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात देखील यात्रेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. यात्रेवेळी लोकांनी राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला. यात्रा कर्नाटकात असताना राहूल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि स्वातंत्र्यवीर सावरकर (Savarkar) यांच्यावर टीका केली होती. त्यावरून भाजप आणि शिंदे गटाने आक्षेप घेतल्याचं पहायला मिळतंय.
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी जोरदार टीका केली. राहुल गांधी यांचं वक्तव्य निंदनीय असल्याचं शेवाळे यांनी म्हटलं आहे. तर त्यांनी भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे.
स्वातंत्र्यावीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवावी. हे राज्य कायद्याचं आणि सावरकरांचं आहे असं दाखवून देऊया, असं राहुल शेवाळे म्हणाले आहेत. राहुल गांधीच्या वक्तव्याविरोधात कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन करावं, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलंय.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएस (RSS) इंग्रजांना मदत करत होता, तर सावरकरांना इंग्रजांकडून भत्ता मिळत होता. आरएसएस कोणत्याही स्वातंत्र्याच्या लढाईत लढले नाहीत, हे सत्य भाजपच्या नेत्यांनी (BJP) मान्य करावंच लागेल, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. देशात द्वेष पसरवणारे व्यक्ती कोण आहेत तसेच ते कोणत्या समाजातून आले आहे, याचा काडीमात्र फरक पडत नाही. द्वेष आणि हिंसा पसरवणं हे देशद्रोही कृत्य आहे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.