शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : खरीप हंगामाच्या शेवटी पडलेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्यात यंदाचा खरीप हंगाम हा जोरदार असणार आहे. मराठवाड्यातील लातूर, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. ज्यात हरभरा पिकाचं बंपर उत्पादन निघण्याची आशा शेतकऱ्यांना आणि कृषी विभागाला आहे. या रब्बी हंगामात पाच जिल्ह्यातील तब्बल ४ लाख ८८ हजार हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झालेली आहे.
मराठवाड्यात पावसाने यावर्षी उशिरा एंट्री मारली. परिणामी लातूर, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ९४ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. तर या पाच जिल्ह्यात वार्षिक सरासरीनुसार ९७ टक्के इतकाच पाऊस झाला. ज्यात लातूर ८९ टक्के, नांदेड १०५ टक्के, उस्मानाबाद ८४ टक्के, हिंगोली १०२ टक्के आणि परभणी जिल्ह्यात १०२ टक्के पाऊस वार्षिक सरासरीनुसार पडला.
खरीप हंगामाच्या शेवटी पडलेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे कसेबसे आलेले सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी या पिकांसह इतरही अनेक पिकांचे मोठं नुकसान केलं. परिणामी शेतकऱ्यांच्या हातातील घास निसर्गाने हिरावला होता. मात्र या अतिरिक्त पावसाचा फायदा हा रब्बी हंगामात होत आहे. लातूर, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र हे ११ लाख १४ हजार २३० हेक्टर क्षेत्र आहे. ज्यापैकी ५ डिसेंबरपर्यंत ७ लाख ८९ हजार ५१९ हेक्टरवर पेरण्या झालेल्या आहेत. म्हणजेच जवळपास ७१ टक्के इतक्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
हरभरा पिकाकडे शेतकऱ्यांचा अधिक कल असून पाच जिल्ह्यात तब्बल ४ लाख ८८ हजार ८५२ हेक्टर म्हणजेच वार्षिक सरासरीच्या १३४ टक्के क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली. तर त्याखालोखाल ज्वारी, गहू, करडई, मका आदी पिकांचा समावेश आहे. आता शेतकऱ्यांना तसेच कृषी विभागालाही हरभरा पिकांकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
खरिपाची पेरणी उशिरा झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची खरिपातील तूर ही शेतात डौलत आहे. त्यामुळे तुरीकडूनही शेतकऱ्यांच्या तसेच कृषी विभागाचेही आशा उंचावल्या आहेत. मात्र रब्बी हंगामात अवकाळी पाऊस, गारपीट गेल्या काही वर्षांपासून होत असल्यामुळे नैसर्गिक संकटं येऊ नयेत अशीच अपेक्षा शेतकरी आणि कृषी विभाग व्यक्त करीत आहे.
एकूणच खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका हा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला. मात्र किमान रब्बी हंगामात निसर्गाने लहरीपणा केला नाही तर शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस येतील.