पुणे : महापालिकेच्या नव्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात पगडीचीच जास्त चर्चा रंगली. राजकीय पक्ष हे एकमेकांचे शत्रू नसतात असा उपदेश उपराष्ट्रपती व्यैंकय्या नायडूंनी पुण्यातल्या कार्यक्रमात केला. पण त्याचा येथे पुण्यात काही उपयोग नाही. कारण याच कार्यक्रमात हा उपदेश त्या कार्यक्रमातच धाब्यावर बसवण्यात आला. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र ते आले नाहीत, या कार्यक्रमात पुणेरी पगडी घालून स्वागत करण्यात येणार होतं, पगडी टाळण्यासाठीच पवार आले नाहीत, अशी चर्चा सुरू झाली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतं कार्यबाहुल्यामुळे पवारांना कार्यक्रमाला येणं जमलं नाही.
महापालिका नवीन सभागृहात उद्घाटनाचा कार्यक्रम सुरु असतानाच छतातून पाणी ठिपकायला लागलं. मग इमारतीचं बांधकाम अपूर्ण असताना केवळ श्रेय लाटण्यासाठी अतिशय घाईत उद्घाटनाचा अट्टाहास का, असाही प्रश्न उपस्थित झाला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसनंही कार्यक्रमाला उपस्थित राहण्याऐवजी रस्त्यावर उभं राहून उपराष्ट्रपतींचं स्वागत करण्याची स्टंटबाजी केली. इमारतीचं अपूर्ण असलेलं काम, निमंत्रण पत्रिकेतील नावं, जाहिरातीतले फोटो अशा अनेक कारणांनी हा कार्यक्रम वादग्रस्त ठरला. त्यामुळे तब्बल ४९ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या इमारतीच्या उद्घाटन समारंभाला नाहक गालबोट लागलं. पुणेकर जनता बिचारी या सगळ्याची मूक साक्षीदार झाली.