पुणे जिल्हा परिषद राष्ट्रवादीकडेच, अध्यक्षपदी पानसरे

पुणे जिल्हा परिषद पुन्हा राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिली आहे.  

Updated: Jan 11, 2020, 07:12 PM IST
पुणे जिल्हा परिषद राष्ट्रवादीकडेच, अध्यक्षपदी पानसरे title=

मुंबई : पुणे जिल्हा परिषद पुन्हा राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीला संपूर्ण बहुमत आहे. त्यामुळे येथे निवडणूक न होता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड ही बिनविरोध झाली आहे. दरम्यान, अध्यक्ष पद महिला वर्गासाठी राखीव असल्याने येथे प्रथमच महिलांमध्ये रस्सीखेच दिसून आली. पुण्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची नावे जाहीर करण्यात आलीत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खेड तालुक्यातील निर्मला पानसरे यांची पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदी आणि भोर तालुक्यातील रणजित शिवतारे यांची उपाध्यक्षपदी आज बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादीकडे बहुमत असल्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे राष्ट्रवादीचे होणार हे निश्चित होते. यावेळी अध्यक्षपद सर्वसाधारण महिला राखीव असल्याने १८ महिला सदस्य इच्छुक होत्या. आता काही दिवसात जिल्ह परिषद विषय समिती सभापती यांची निवड होणार आहे.

जि. प. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी निर्मला पानसरे आणि रणजित शिवतारे यांच्या नावांची घोषणा केली. त्यानंतर दोघांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वसाधारण सभेत या दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. मावळते अध्यक्ष विश्वास देवकाते, खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.