वनराज आंदेकरचा गेम करुन ते पळाले, ताम्हिणी घाटात असे सापडले... पोलिसांकडून फिल्मी स्टाईल अटक

Vanraj Andekar Murder Case : राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची गोळीबार आणि कोयत्याने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. संपत्तीच्या वादातून सख्ख्या बहिणींनी आपल्या भावाचा जीव घेतला. याप्रकरणी पुणे पोलिसांनी फिल्मी स्टाईलने 13 जणांना अटक केली आहे.   

राजीव कासले | Updated: Sep 3, 2024, 08:22 PM IST
वनराज आंदेकरचा गेम करुन ते पळाले, ताम्हिणी घाटात असे सापडले... पोलिसांकडून फिल्मी स्टाईल अटक title=

Vanraj Andekar Murder Case : राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या हत्येने पुण्यात एकच खळबळ उडाली. पुण्याच्या नाना पेठेतली ही अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली होती.  5 ते 6 दुचाकीवरुन आलेल्या 10 ते  12 हल्लेखोरांनी क्षणाचाही विलंब न करता पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. त्यानंतर कोयत्याने वनराजवर सपासप वार केले.  वनराज आंदेकरची भर रस्त्यात हत्या (Vanraj Andekar Murder) करण्यात आली. मात्र त्याचे मारेकरी दुसरे तिसरे कुणी नाहीत तर त्याच्या सख्ख्या बहिणीच निघाल्या. सख्ख्या बहिणींनीच आपल्या नवऱ्यासोबत मिळून आंदेकरच्या मृत्यूचा कट रचला.

फिल्मी स्टाईलने अटक
वनराज आंदेकर खून प्रकरणी 13 जणांना ताम्हिणी घाटातून (Tamhini Ghat) पुणे क्राईम ब्रांच (Pune Crime Branch) आणि रायगड पोलिसांनी (Raigad Police) ताब्यात घेतलं आहे. जेवणासाठी हे सगळे जणं ताम्हिणी घाट परिसरात थांबले होते. जेवण झाल्यानंतर तामिनी घाटातून पुढे जाण्याच्या आधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. वनराजच्या दोन सख्ख्या बहिणी आणि मेहुण्यांनाही अटक करण्यात आली आहे. 

सख्ख्या बहिणींनी रचला कट
जयंत कोमकर, गणेश कोमकर, संजीवनी कोमकर आणि कल्याणी कोमकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गणेश कोमकर आणि जयंत कोमकर या दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. मागील 3 ते 4 वर्षांपासून कौटुंबिक तसंच संपत्तीबाबत त्यांचा आपला भाऊ वनराजसोबत वाद सुरु होता. गणेश कोमकरला नाना पेठेतील एक दुकान दिलं होतं. मात्र पुणे महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईत दुकान पाडण्यात आलं. वनराजनेच दुकानांवर कारवाई करायला सांगितल्याचा संशय कोमकरांना होता. तू आमच्या पोटावर उठलास तुला सोडणार नाही असा धमकीवजा इशारा बहिणींनी वनराजला दिला होता. त्यानंतर बहिणी त्रास देत असल्याबाबतची तक्रार वनराजने समर्थ पोलीस स्टेशनमध्ये दोन दिवसांपूर्वीच केली होती

आणि दोन्ही बहिणींना हा धमकीवजा इशारा खरा करुन दाखवला
घरातील कार्यक्रम संपल्यानंतर वनराज त्याच्या अशोक चौकातील कार्यालयाजवळ येऊन थांबला होता. तेवढ्यात बाईकवरुन आलेल्या हल्लेखोरांनी आंदेकरवर एकामागोमाग एक पाच गोळ्या झाडल्या. आंदेकर गँग ही पुण्यात गेली 40 वर्ष कुप्रसिद्ध आहे. मटका, जुगार, दारू, हफ्ते वसुली अशा अवैध कृत्यांमध्येही त्यांचा सहभाग होता. गुन्हेगारीबरोबरच वनराज राजकारणातही सक्रिय होता... दुकानाचे अतिक्रमण पाडायला लावल्याचा रागातून सख्ख्या  बहिणींनीच वनराज आंदेकरची सुपारी दिलीय. आणि भर चौकात गोळ्या झाडत आणि  कोयत्याने वार करुन आपल्याच भावाचा गेम केला.