पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील एका नामांकित गर्ल्स हायस्कूलमध्ये 11 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. आरोपीने शाळेच्या स्वच्छतागृहात मुलीवर बलात्कार केला. पुण्यातील शिवाजीनगर परिसरात ही घटना घडली असून शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
काही दिवसांपूर्वीच येरवडा इथल्या एका शाळेत एकतर्फी प्रेमातून दहावीच्या मुलीवर शाळेत घुसून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच 11 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आल्याने पुण्यात कायदा सुव्यवस्था आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 23 तारखेला एक अनोळखी व्यक्ती शाळेत आली, त्याने पीडित मुलीला जबरदस्तीने स्वच्छतागृहात नेत, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितलं तर वाईट होईल अशी धमकीही त्याने पीडित मुलीला दिली.
या घटनेनं घाबरलेल्या मुलीने तिच्या मैत्रिणीला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर मैत्रिणीने शाळेतील शिक्षकांना याची माहिती दिली आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला. शाळेतल्या सीसीटीव्हीवरुन शिवाजीनगर पालीस अधिक तपास करत आहेत.