अखेर पुण्यातील शिवसृष्टीचा मार्ग मोकळा, पण श्रेयवाद पेटला

मेट्रो स्टेशनच्या सिग्नलवर अडकलेल्या पुण्यातील शिवसृष्टीचा मार्ग मुख्यमंत्र्यांनी मोकळा केलाय.

Updated: Feb 7, 2018, 10:29 PM IST
अखेर पुण्यातील शिवसृष्टीचा मार्ग मोकळा, पण श्रेयवाद पेटला title=

अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : मेट्रो स्टेशनच्या सिग्नलवर अडकलेल्या पुण्यातील शिवसृष्टीचा मार्ग मुख्यमंत्र्यांनी मोकळा केलाय. मात्र, त्यावरून पुण्यात श्रेयवादाचं राजकारण सुरु झालय. त्याबरोबरच बीडीपीमध्ये शिवसृष्टी उभारण्यातील अडथळेदेखील समोर दिसू लागले आहेत. 

लाल महाल चौकात आनंदोत्सव

लाल महाल चौकात हा आनंदोत्सव सुरु आहे. शिवसृष्टीचा प्रश्न निकाली काढल्याबद्दल प्रत्यक्ष महाराज पेढे वाटप करताहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापटांचा जयघोष सुरु आहे. पुण्यामध्ये शिवसृष्टी उभारण्याच्या निर्णयावर भारतीय जनता पक्षानं दावा सांगितलाय. त्यासाठीचा हा जल्लोष आहे. 

काय होता वाद?

कोथरूडमधील कचरा डेपोच्या जागेवर मेट्रो स्टेशन की, शिवसृष्टी या वादात हा विषय अडकला होता. स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यावर निर्णय दिलाय. कचरा डेपोच्या जागेवर मेट्रो स्टेशन आणि चांदणी चौकातील बीडीपीच्या जागेत शिवसृष्टी असा तोडगा यासंदर्भात काढण्यात आलाय. 

भाजपचा श्रेयवाद

पुण्यासह राज्यात याआधी काँग्रेस - राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यांना १० वर्षांत जे जमलं नाही ते आम्ही सत्तेत आल्यावर वर्षभरात करुन दाखवल्याचा दावा सत्ताधारी भाजपनं केलाय. तर हे कुणा एकाचं श्रेय नसल्याचं विरोधकांनी स्पष्ट केलंय. महापालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकरांनी शिवसृष्टीचा सर्वाधिक आग्रह धरला होता. त्याचप्रमाणे इतर पक्षांनीदेखील शिवसृष्टीचा पाठपुरवा केल्याचं त्यांनी म्हटलंय.     

काकडे - बापट गटात श्रेयवाद पेटलाय

सत्ताधारी भाजपमधील काकडे - बापट गटांतही हा श्रेयवाद पेटलाय. अर्थात हे वेगळं सांगण्याची गरज नाही.  आम्ही केलं कि तुम्ही केलं यावरून वाद सुरु असला तरी पुण्यातील सर्व पक्षांनी या निर्णयाचं स्वागत केलय. असं असताना राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाणांचा बीडीपीमध्ये शिवसृष्टी उभारण्यावर आक्षेप आहे. पक्षाला मान्य असला तरी पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्या म्हणून त्यांना हा निर्णय मान्य नाही. बीडीपीऐवजी पीएमआरडीएच्या क्षेत्रात इतरत्र कुठेही शिवसृष्टी उभारण्यात यावी अशी त्यांची भूमिका आहे. पर्यावरणाची हानी करणारा हा निर्णय स्वतः शिवाजी महाराजांनाही पटला नसता अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.