Pune Politics Vasant More : पुणे शहरातील प्रसिद्ध आणि धडाडीचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला जय महाराष्ट्र ठोकला अन् पुण्याच्या राजकारणात खळबळ (Pune Politics) उडवून दिली. वसंत मोरे यांनी मनसेच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला अन् राज ठाकरे यांची अखेर साथ सोडली. गेल्या 3 वर्षापासून मनातील खदखद वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत मांडली. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचं देखील दिसून आलं होतं. अशातच आता वसंत मोरे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Sharad Pwar Camp) कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे आता वसंत तात्या शरद पवार गटात प्रवेश करणार का? असा सवाल विचारला जात आहे. त्यावर वसंत मोरे यांनी स्पष्टीकरण दिलंय.
काय म्हणाले वसंत मोरे?
पुण्याचं मैदान मारण्यासाठी शरद पवारांच्या भेटीसाठी आलो आहे, असं वसंत मोरे यांनी म्हटलं. मी पुणे लोकसभेसाठी इच्छुक आहे, त्यासाठीच मी शरद पवारांना भेटण्यासाठी आलोय. त्यांनी मला आज याठिकाणी बोलवलं त्यामुळे कार्यालयात आलोय. माझी आणि अमोल कोल्हे यांची गेल्या 5 वर्षांपासून चांगली मैत्री आहे, असंही वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. मला निरोप आला अन् मी आलोय, काय बोलणं होतंय पाहुया, असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.
निलेश लंकेंचा शरद पवार गटात प्रवेश कधी?
वसंत मोरे यांचा शरद पवार गटातील प्रवेश निश्चित मानला जातोय. तर अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांचा आज शरद पवार गटात प्रवेश होणार आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांचा पक्षप्रवेश एकत्र होणार का? असा सवाल विचारला जात आहे.
वसंत मोरे यांची मनसेला सोडचिठ्ठी
वसंत मोरे यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पत्र लिहिलं अन् मनातील खदखद व्यक्त केली. पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याची मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष वाढीसाठी गेली 18 वर्ष सातत्याने काम करत आहे. पण अलीकडच्या काळात पूणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण आणि पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनायी आहेत. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कोंडी करण्याचं तंत्र अवलंबलं जात आहे, म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे, असं वसंत मोरे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.