Pune LokSabha Election : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. देशभरात एकूण 7 टप्प्यात निवडणुका (LokSabha Election 2024) होणार असून त्यातील 5 टप्प्यात महाराष्ट्रात निवडणुकीचं रणशिंग फुकलं जाणार आहे. अशातच राज्यातील सर्वात उत्सुकतेची जागा बनलीये ती म्हणजे पुण्याची... भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी प्रचाराचा नारळ फोडलाय. तर दुसरीकडे मनसेला रामराम ठोकणाऱ्या वसंत मोरे यांनी देखील निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केलीये. मात्र, काँग्रेसकडून (Congress Pune LokSabha Candidate) उमेदवार कोण असणार? यावर अद्याप शिक्कामोर्तब केला नाही. अशातच आता माध्यमांशी बोलताना भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठा खुलासा केला आहे.
पुण्यात महायुतीच्या सर्व घटक पक्षांची समन्वय बैठक आज पार पडली. त्यावेळी चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी पदाधिकाऱ्यांना सुचना केल्या अन् मुरली अण्णांच्या विजयाचा पाया रचण्याचा प्रयत्न केलाय. त्यावेळी त्यांनी पुण्यात तिरंगी लढत होईल, अशी शक्यता देखील बोलून दाखवली. चंद्रकांत पाटील बोलत असताना त्यांना पुण्यातील मतांच्या समीकरणाविषयी विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी काँग्रेसकडून न जाहीर झालेल्या उमेदवाराचं नाव सांगितलं.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
भारतीय जनता पक्ष एक मजबूत पक्ष आहे. त्यामुळे वसंत मोरे अपक्ष जरी लढले तरी त्याचा भाजपवर काहीही परिणाम होणार नाहीये. भाजपची मुळ मतं ही भाजपकडेच राहतील. मागल्या वेळी आम्हाला 6 लाख 31 हजार मतं मिळाली. यंदा आम्ही त्याहून अधिक मताधिक्याने विजयी होऊ, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. वसंत मोरे यांच्या निर्णयाचा भाजपवर परिणाम होणार नाही, ते भाजपची मतं खाणार नाहीत. तर त्याचा फटका समोरच्या म्हणजेच काँग्रेसच्या उमेदवाराला मोहन जोशींना बसेल, ते त्यांची मतं खातील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी मोहन जोशी यांना थेट काँग्रेसचा उमेदवार घोषित केल्याने सध्या पुण्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. दुसरीकडे, 12 मार्चला वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला होता. तात्यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी वसंत मोरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. वसंत मोरे यांनी बाळासाहेब थोरात यांच्याशी देखील फोनवरून चर्चा केल्याचं सांगण्यात येत होतं. त्यामुळे आता मोहन जोशी यांनाच काँग्रेसकडून तिकीट मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.