नसते धाडस करू नका! पोहता येत नसतानाही कुंडात उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

Pune News: मित्रांसोबत पर्यटनासाठी गेलेल्या सोलापूरच्या 21 वर्षीच तरुणाचा 1200 फूट खोल दरीतील कुंडात बुडून मृत्यू झाला आहे. बऱ्याच प्रयत्नानंतर तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

आकाश नेटके | Updated: Dec 13, 2023, 09:39 AM IST
नसते धाडस करू नका! पोहता येत नसतानाही कुंडात उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू title=

चैत्राली आहेर, झी मीडिया, पुणे : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात मित्रांसोबत पर्यटनासाठी गेलेल्या एका तरुणाचा 1200 फूट खोल दरीतील कुंडात पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोहोण्याचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. दरम्यान, पर्यटकांनी जीवावर बेतेल किंवा आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल अशा गोष्टी करु नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मुळशी तालुक्यातील प्लस व्हॅली येथे पिंपरी चिंचवड शहरातून मित्रांबरोबर पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा 1200 फूट खोल दरीतील कुंडात पडून मृत्यू झाला आहे. रोहन विरेश लोणी असे 21 वर्षीय पर्यटकाचे नाव आहे. रोहन हा मूळचा सोलापूर मधील रहिवासी असून सध्या तो पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यास होता. मंगळवारी तो त्याच्या इतर चार मित्रांबरोबर फिरण्यासाठी प्लस व्हॅली इथे आला होता. त्यावेळी रोहन तिथे असलेल्या कुंडामध्ये पोहता येत नसतानाही पाण्यात उतरला. मात्र लगेचच तो पाण्यात बुडू लागला. इतर तीन मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला पण तो पाण्यात बुडाला.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी लोणावळा शिवदुर्ग टीम, मुळशी आपत्ती व्यवस्थापनचे पथक दाखल झाले. त्यांनी 1200 फूट खोल दरीतील कुंडात उतरून मृतदेह बाहेर काढला. घटनेची माहिती मिळताच पौड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, मुळशी तालुका हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असला तरी याठिकाणी येताना पर्यटकांनी पर्यटनस्थळांची पूर्ण माहिती घेऊन पर्यटन करावे. पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घ्यावा मात्र हुल्लडबाजी करू नये असे आवाहन पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी केले आहे.

पोलिसांनी काय सांगितले?

"मुळशी तालुका डोंगररांगा आणि धरणांचा भाग असल्यामुळे वर्षभर पर्यटकांचा इथे ओढा असतो. आंततराष्ट्रीय स्तरावरचे कार्यक्रम इथे होत असतात. मात्र काही थिल्लर पर्यटकांमुळे सुटीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना त्याचा त्रास होतो. या ठिकाणी ट्रेकिंगसाठी गिर्यारोहक देखील येत असतात. त्यांना फारशी माहिती नसल्यामुळे काही घटना घडतात. सकाळी प्लस व्हॅली इथे चार तरुण पोहण्यासाठी आले होते. पण एकाला पोहता येत नसतानाही पाण्यात उतरला होता. त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. मृतदेह बाहेर काढण्यासाठी मुळशी आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी आणि कर्मचारी  रवाना करण्यात आले होते. सर्वांनी पर्टनाचा आनंद घ्यावा. पण जीवावर बेतेल किंवा आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल अशा गोष्टी करु नयेत," असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी केले.