थकलेल्या ऊस बिलासाठी 'जनशक्ती'चे साखर संकुलात घुसून आंदोलन; साखर आयुक्तांच्या खुर्चीचा केला लिलाव

Pune News : थकलेल्या ऊस बिलासाठी 'जनशक्ती'चे साखर संकुलात घुसून घोषणाबाजी करण्यात येत आहे. भीक मागो आंदोलनातून आलेल्या पैशातून साखर आयुक्त व कारखान्याच्या चेअरमनला रक्कम पाठवली जाणार आहे.

सागर आव्हाड | Updated: Sep 5, 2023, 02:00 PM IST
थकलेल्या ऊस बिलासाठी 'जनशक्ती'चे साखर संकुलात घुसून आंदोलन; साखर आयुक्तांच्या खुर्चीचा केला लिलाव  title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : ऊस (sugarcane) कारखान्यांचा गळीत हंगाम संपून पाच महिने झाले आहेत. अशातच आता दुसऱ्या हंगामाची तयारी सुरु होण्याच्या मार्गावर आहे. परंतु आजतागायत साखर कारखानदारांकडून (Sugarcane Mill) शेतकऱ्यांना थकीत ऊस बिले देण्यात आली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. दिग्विजय बागल यांच्याकडे असणारा मकाई सहकारी साखर कारखाना भिलारवाडी, रणजित शिंदे यांच्याकडे असणारा कमलाई साखर कारखाना करमाळा या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले ऊस उत्पादकांना दिली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

कारखानदारांनी हजारो शेतकऱ्यांवर बोगस कर्ज काढली आहेत. शेकडो वाहन मालकांवर कर्ज काढली आहेत. बऱ्यापैकी कामगारांचा पगार देखील थकवला आहे. तसेच ऐन पावसाळी हंगाम असताना दुष्काळ सदृश परिस्थिती असताना कारखान्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. शेतकरी आत्महत्येसारखा पर्याय निवडत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी जनशक्ती शेतकरी संघटनेने थेट साखर संकुलाच्या गेटमध्ये घुसून आंदोलन केले आहे.

या साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांची थकीत बिले लवकर अदा करावी यासाठी जनशक्ती शेतकरी संघटनेने साखर आयुक्त व सरकारला पत्र देऊन 5 सप्टेंबरचा अल्टिमेटम दिला होता. त्यानुसार जनशक्ती संघटनेने साखर संकुलाच्या गेटमध्ये घुसून आंदोलन केले आहे. साखर आयुक्ताच्या खुर्चीचा लिलाव करून येणारी रक्कम ही साखर आयुक्त व कारखान्याच्या चेअरमनला पाठवली जाणार आहे. शेतकऱ्यांनी आक्रमक होत रस्त्यावरती भीक मागून आंदोलन करत साखर आयुक्ताच्या कारभाराचा निषेध नोंदवला आहे. यावेळी शेतकरी नेते अतुल खूपसे बाळासाहेब सानप व इतर शेतकरी उपस्थित होते.