अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) हे नेहमीच त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी कायमच चर्चेत असतात. कधी कधी त्यांच्या याच स्वभावामुळे ते अडचणीतही आले होते. मात्र आताही अजित पवार त्यांच्या खास शैलीत लोकांना सल्ले देत असतात. त्यानंतर आता इंग्रजी (English) शिकण्यावर भर द्या असा सल्ला अजित पवार यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना (Teacher) दिला आहे. यासोबत अजित पवार यांनी लेखाजोखा मांडत आणि निकालावरुन शिक्षकांचे कान टोचले आहेत.
पुणे जिल्हा परिषद आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण आणि शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थी सत्कार समारंभात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवार यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. "राज्यातील मराठी माध्यमाच्या काही शाळा या इंग्रजी माध्यमात परिवर्तित कराव्या लागणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलणे झाले आहे. 30 हजार शिक्षकांची भरती करत असताना त्यात इंग्रजी माध्यमासाठीच्या शिक्षकांची देखील भरती केली जाणार आहे. यातून वेगळा अर्थ काढायचे कारण नाही. इंग्रजी माध्यमाकडील ओढा आणि गरज लक्षात घेता हा निर्णय घेणार आहोत. मराठी माध्यमाच्या शाळांना कमी लेखणे किंवा त्यांचं महत्व कमी करणे हा उद्देश नाही," असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
बारामतीचा निकाल शून्य टक्के, अजित पवारांनी टोचले शिक्षकांचे कान
"पाचवीचा शिष्यवृत्तीचा निकाल लागला आहे. या परीक्षेत 640 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात शिरूरची मुले सर्वाधिक आहेत. दुसऱ्या क्रमांकावर खेड तर सातव्या क्रमांकावर बारामती तालुका आहे. पुरंदर तालुक्यातून एक जण उत्तीर्ण झाल्यामुळे अब्रु राखली गेली आहे. शिरूर तालुका शिष्यवृत्तीच्या निकालात क्रमांक एक वर आहे. बारामती, भोर आणि हवेलीचा निकाल शून्य टक्के आहे. आता काय कपाळ फोडून घेऊ का? आम्ही सकाळी सहा वाजल्यापासून मरमर काम करतो आणि बारामतीचा निकाल शून्य. सगळ्या शिक्षकांना हवेली तालुक्यात बदली पाहिजे असते. दादा पुण्याच्या जवळ बदली द्या म्हणतात आणि निकाल शून्य टक्के. आम्ही आमचे काम करतो. काही अडचणी असतील तर सांगा पण मुलांना घडवण्याचं काम नीटपणे करा. अन्यथा पुढच्या वर्षी बढती किंवा इतर बाबतीत काही निर्णय घेतल्यास तुम्हाला त्याचे वाईट वाटेल," अशा शब्दात अजित पवार यांनी शिक्षकांचे कान टोचले आहेत.
शरीर तंदुरुस्त ठेवा, ढेरी सुटू देऊ नका - अजित पवार
"फक्त शाळेच्या नावात इंग्रजी शाळा असून चालणार नाही. तर विद्यार्थ्यांना, शिक्षकांना चांगलं इंग्रजी वाचता बोलता यायला पाहिजे.
इंग्रजी ही ज्ञानाची आणि जागतिक संवादाची भाषा आहे. मराठीला कमी लेखण्याचा हेतू नाही. शिक्षणात मेरिटला महत्व आहे. खऱ्या गुणवंतांनाच पुरस्कार मिळतात. चारित्र्यसंपन्न पिढी घडवणं हे शिक्षणाचं काम आहे. त्यासोबत नैतिक मूल्ये जपली गेली पाहिजे. करिअर निवडताना मळलेल्या वाटावर जाऊ नका. त्याऐवजी नवनवीन मार्ग निवडा. मळलेल्या वाटेवर जाण्यापेक्षा नवीन वाट स्वीकारली तर संधी आणि यशाची शक्यता वाढते. यासोबत चांगले छंद जोपासा. व्यसन करू नका. शरीर तंदुरुस्त ठेवा. ढेरी, पोट सुटू देऊ नका. वेळेवर उठा, वेळ पाळा," असाही सल्ला अजित पवारांनी दिला.
लवकर वेळेवर उठायला शिका - चंद्रकांत पाटील
"अजित दादांनी संपूर्ण जिल्ह्यातील गुणवत्तेचा तालुकानिहाय आढावा घेतला. त्यांनी ओरखडा न उठू देता चिमटा घेतला. दादा बोलले त्याला मी फक्त मम म्हटले तरी पुरेसे ठरेल. नवीन शैक्षणिक धोरण अमलात येणार आहे. त्यात पहिलीच्या आधीची 3 वर्षे महत्वाची मानली आहेत. मातृभाषेतून शिक्षण ( दादा इंग्रजी ज्ञानाची भाषा म्हणत असले तरी), परंपरांचा अभिमान, संस्कार आणि रोजगाराभिमुख शिक्षण हा नवीन शैक्षणिक धोरणाचा पाया असणार आहे. खूप काम करणारी माणसं जगाला हवी आहेत. अजित दादा सकाळी 6 वाजता कामाला सुरुवात करतात. अनेक जण असे असतात की सकाळी केव्हाही फोन केला तरी आवरताहेत असच उत्तर मिळतं," असे चंद्रकांत पाटील म्हणाले.