सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्याच्या एनएफएआय या प्रतिष्ठित चित्रपट संवर्धन संस्थेत प्रभास चंद्रा लिखील आणि दिग्दर्शित 'आय एम नॉट द रिव्हर झेलम' या चित्रपटामध्ये भारतीय सैन्याबद्दल आक्षेपार्ह मजकुर असल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी राडा घातला आहे. समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातल्याची माहिती उघड झाली आहे.
चित्रपटामध्ये भारतीय सैन्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर असल्याचा आरोप करत या संघटनेच्या वतीनं चित्रपटाचे पोस्ट फाडत निदर्शनं करण्यात आली. पुण्याच्या डेक्कन पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी सदर प्रकरणानंतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. या चित्रपटाभोवती फिरणाऱ्या या वादाच्या चक्रामुळं एकाएकी इंटरनेटवरही या चित्रपटाची चर्चा होऊन अनेकांनीच त्यासंदर्भातली माहिती शोधल्याचं पाहायला मिळालं.
‘I am not River Jhelum’ या चित्रपटाचं स्क्रिनिंग सिनेमाज ऑफ इंडिया फेस्टिव्हलमध्ये होत असतानाच तिथं या हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते पोहोचले आणि त्यांनी 'जय श्रीराम' अशा घोषणा देत प्रवेशद्वारापाशीच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. आंदोलकांपैकी काहीजण प्रेक्षकांमध्येही हजर होते. ज्यानंतर त्यांनी आयोजकांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्हं उपस्थित केलं.
उपलब्ध माहितीनुसार समीक्षक आणि जाणकारांची पसंती मिळालेला ‘I am not River Jhelum’ या चित्रपटातून काश्मीरमध्ये राहणाऱ्या अफिफा नावाच्या एका प्रमुख पात्राच्या जीवनात डोकावण्याची संधी आणि तेथील परिस्थिती पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळते.
दरम्यान, सदर चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी घडलेल्या या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस यंत्रणांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी 18 जणांना ताब्यात घेतलं. 'प्रभास चंद्रा दिग्दर्शित या चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी खुद्द त्यांचीही उपस्थिती होती. इथं आम्ही घटनास्थळी कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी प्रयत्नशील असून, चित्रपटामध्ये कोणताही आक्षेपार्ह संदर्भ आढळल्यास पुढील कारवाई करण्यात येईल' अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी विवेक हसबनीस यांनी दिली.
Cinemas of India या तीन दिवसीय महोत्सवामध्ये हिंदी, कन्नड, मल्ल्याळम, मराठी, बंगाली, तामिळ, मणिपूरी, राजस्थानी, खासी-जैनिता- गारो- हिंदी अशा जवळपास 13 भाषांमधील चित्रपट प्रदर्शित करण्यात आले.