Pune News : पुणे तिथे काय उणे असं अनेकजण म्हणतात. पण, सध्या मात्र पुणे तिथे खूप काही उणे... अशीच स्थिती पाहायला मिळत आहे. निमित्त ठरतेय ती म्हणजे एक आकडेवारी. देशाच्या संसदेपर्यंत चर्चेत असणारा पुण्यातील एक विषय सध्या अनेकांच्याच नजरा वळवत आहे. हा मुद्दा आहे पुण्याती विमानतळाचा.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील खासदार वंदना चव्हान यांनी पुणे विमानतळावर असणाऱ्या मूलभूत सुविधांचा अभाव आणि तत्सम मुद्द्यांकडे सर्वांचं लक्ष वेधलं. मागील वर्षी Airport Service Quality (ASQ) सर्वेक्षणामध्ये पुणे विमानतळाला किमान आकड्यांसह खालचा दर्जा मिळाल्याची बाबही यावेळी पुन्हा प्रकाशझोतात आली.
'प्रत्येक विमानतळावर पुरेपूर देखभाल आणि प्रवाशांना महत्त्वाच्या सुविधा पुरवल्या जाणं अपेक्षित असतं. पण, पुणे विमानतळावर मात्र तसं चित्र पाहायला मित नसून, या विमानतळाची क्रमवारी घसरतच चालली आहे. अशा परिस्थितीत पुण्यासारख्या विमानतळांसाठी कोणती पावलं उचलली जात आहेत?', असा सवाल चव्हाण यांनी सार्वजनिक हवाई वाहतूक राज्यमंत्री वीके सिंह यांना राज्यसभेत विचारला.
विमानतळावर पुरवण्यात येणाऱ्या सुविधा आणि प्रवाशांसाठी असणाऱ्या सेवा यासंदर्भातील सर्वेक्षणामध्ये पुण्याची क्रमवारी 70 वरून थेट 72 वर पोहोचली आहे. प्रवासी संख्येच्या बाबतीत पुणे विमानतळावरून मोठ्या संख्येनं प्रवास होत असून, देशात या विमानतळाचा नववा क्रमांक आहे. पण, प्रत्यक्षात मात्र प्रवाशांना सुविधा पुरवण्यामध्ये मात्र या विमानतळाचा दर्जा घसरताना दिसत आहे.
‘एसीआय-एएसक्यू’च्या वतीनं हे सर्वेक्षण विमानतळावर प्रवाशांना मिळणाऱ्या सेवा आणि सुविधांच्या आधारे करण्यात येतं. जिथं प्रवाशांचीही मतं विचारात घेतली जातात. यामध्ये विमानतळावरील स्वच्छतागृहाची स्थिती, चेक इन आणि सिक्युरिटी काऊंटवर प्रवाशांना लागणारा वेळ, टर्मिनलवरील स्वच्छता, टर्मिनलमधील खाद्यपदार्थांचे स्टॉल, कर्मचारी आणि प्रवाशांमधील संवाद या आणि अशा साधारण 28 निकषांचा या सर्वेक्षणात सहभाग असतो.
ACI-ASQ कडून 2006 पासूनच विमानतळांचं सर्वेक्षण दरवर्षी करण्यात येत आहे. या सर्वेक्षणामध्ये 95 देशांमधील 400 विमानतळांचा समावेश असतो. यामध्ये पुणे विमानतळ ‘बेस्ट एअरपोर्ट बाय साईज' या वर्गात असून, या विभागात भारतातील 15 विमानतळांचा समावेश आहे. या यादीत पुण्याच्या विमानतळाचं 11 वं स्थान असलं तरीही दर्जाच्या बाबतीत मात्र ते 72 व्या स्थानी घसरलं आहे.