वसंत मोरेंच्या डोक्यात अजित पवारांच्या ऑफरची टिकटिक?, राज ठाकरे काय निर्णय घेणार?

वसंत मोरेंबाबत मनसे काय भूमिका घेणार? दोन दिवसात ठरणार!

Updated: Dec 6, 2022, 06:48 PM IST
वसंत मोरेंच्या डोक्यात अजित पवारांच्या ऑफरची टिकटिक?, राज ठाकरे काय निर्णय घेणार? title=

Pune Vasant More : पुण्यातील मनसेचे फायरब्रंड नेते वसंत मोरे (MNS Vasant More) यांनी अनेकवेळा पक्षाच्या अंतर्गत गटबाजीबाबत उघडपणे आपली नाराजी बोलूव दाखवली आहे. आता काही दिवसांवर निवडणुका आल्या असताना एका कार्यक्रमामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार (NCP Ajit  Pawar) यांनी मोरेंना राष्ट्रवादीमध्ये येण्याची खुली ऑफर दिली होती. या ऑफरमुळे आता तात्या लवकरच मनसेला रामराम करणार असल्याच्या चर्चांना जोर धरला आहे. अशातच मनसेनेही मोरेंच्या नाराजीनंतर मोठा निर्णय घेतला आहे. 

वसंत मोरेंच्या नाराजीवर पक्ष अधिकृतपणे आपली भूमिका अधिकृतपणे जाहीर करणार असल्याचं पुण्यातील मनसेचे नेते बाबू वागस्कर यांनी सांगितलं आहे. पुण्यात आज मंगळवार कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीलाही वसंत मोरे यांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चांणी जोर धरला आहे. 

आगामी पुणे महापालिका (Pune Municipal Corporation Election) निवडणुकीपूर्वी वसंत मोरेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिल्यानं मनसेचं टेन्शन वाढलंय. वसंत मोरे म्हणजे पुण्यातील मनसेचा चेहरा आहे. वसंत मोरे यांना नाराज करणं मनसेला परवडणारं नाही, तसेच मनसे सोडणार नसल्याचं देखील वसंत मोरे यांनी सांगितलं होतं. पुण्यात वसंत मोरे मनसेच्या बड्या नेत्यांमधील एक चेहरा आहे. त्यामुळे आता दोन दिवसानंतर मनसे काय भूमिका घेणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याची भूमिका घेतली होती. मात्र, वसंत मोरे यांना राज ठाकरेंची ही भूमिका रुचली नाही. वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि आपलं म्हणणं बोलून दाखवलं होतं. त्यानंतर राज ठाकरे यांनी साईनाथ बाबर (Sainath Babar) यांना शहराध्यक्ष नियुक्त केलं होतं. त्यानंतर वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा होती.