Raj Thackeray: आमच्या रक्तात अजून महापुरुष यायचेत, त्यात फक्त जातीचं राजकारण भरलंय, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच पुण्यातील भारत इतिहास संशोधन संस्थेला भेट दिली. सदाशिव पेठ येथील इमारतीचा पुनर्विकास करण्यात येत असून त्याची माहिती राज ठाकरे यांनी घेतली. यावेळी त्यांनी संस्थेला 25 लाख रुपयांची देणगी जाहीर केली.
जातीतून इतिहास वाचतो हे महाराष्ट्राचं राजकारण असल्याचे ते यावेळी म्हणाले. फक्त शिवाजी महाराज की जय म्हणजे इतिहास नाही, तर हे सगळं सांभाळलं जावं, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
बाबरीची वीट आणि 25 लाखाचा धनादेश राज ठाकरे यांनी संस्थेला भेट दिली. बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा मनसे नेते बाळा नांदगावकर तेथे होते. त्यांनी ही वीट अयोध्येतून आणली होती. काही दिवसांपुर्वी त्यांनी ही वीट मनसे अध्यक्षांना भेट दिली होती. आता राज ठाकरेंनी ही वीट इतिहास संशोधन मंडळाला दिली. त्या विटेवरही संशोधन व्हावं, असे ठाकरे यावेळी म्हणाले.
भूतकाळात केलेल्या चुका वर्तमानात घडू नये हे कळण्यासाठी इतिहास वाचावा लागतो, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. हजारो वर्षांचा इतिहास महारष्ट्रकडे आहे. महाराष्ट्राकडे इतिहास आहे, बाकीच्यांकडे भूगोल असल्याचे विधान त्यांनी यावेळी केले.