Pune Lok Sabha : पुण्यात भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. तर त्यांच्यासमोर आव्हान आहे ते मविआच्या रवींद्र धंगेकरांचं. पुण्यात भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे आता पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात थेट सामना होणार आहे. पुणेकर कुणाला पसंती देणार, हे चार जून रोजी स्पष्ट होईल.
काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांना लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच पुण्यातलं काँग्रेसमधलं नाराजीनाट्य समोर आलंय. काँग्रेस नेते आणि सात वेळा नगरसेवक राहिलेल्या आबा बागुल यांनी नाराजी व्यक्त केलीय.. पुण्यात निष्ठेची हत्या झाली असं स्टेटस आबा बागुल यांनी ठेवत काँग्रेस नेतृत्त्वाला अनेक सवाल विचारलेत.
काँग्रेसकडून आबा बागुल पुण्यात लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, रवींद्र धंगेकरांना उमेदवारी मिळाल्यानंतर काँग्रेसमधली धुसफूस समोर आलीय. आबा बागुल आता राहुल गांधी आणि खरगेंचीही भेट घेणारेत. तर, दुसरीकडे मनसेला जय महाराष्ट्र करणा-या वसंत मोरेंनीही एकला चलो रे चा नारा दिलाय. पुण्याची लोकसभेची निवडणूक एकतर्फी होणार नाही असा इशाराच मोरेंनी दिला.
पुण्यातली सध्याची लढाई ही भाजपच्या मुरलीधर मोहोळ आणि मविआच्या रवींद्र धंगेकरांमध्ये आहे. दोघेही पुणे महापालिकेत नगरसेवक होते.. मुरलीधर मोहोळ नंतर महापौर झाले. तर, रवींद्र धंगेकर गटनेते.. रवींद्र धंगेकरांनी नंतर कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव करत आमदारकी पटकावली. मात्र हीच आमदारकी आता धंगेकरांना अडचणीची ठरतेय काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.. धंगेकर आणि मोहोळ या दोघांचीही पुणेकरांच्या मनात चांगली प्रतिमा आहे. लोकसभेच्या निवडणुकीत त्यामुळे पुण्यात तगडी लढत होणार आहे. तरीही वसंत मोरेंच्या एकला चलो रेची भूमिका आणि काँग्रेसमधल्या अंतर्गत नाराजीनाट्य याचा कोणाला फटका बसणार आणि कोणाला फायदा होणार हे 4 जूनला निकालावेळीच कळेल.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता मावळल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. कारण दोघांनीही लोकसभा लढवण्यास इच्छुक नसल्याचं हायकमांडला कळवल्यानं आता उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे चंद्रपूरमधून आमदार प्रतिभा धानोरकर यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर भंडारा-चंद्रपूरमधून आता पटोलेंऐवजी दुस-या इच्छुकाला उमेदवारी मिळण्याची चिन्ह आहेत. पटोलेंनी साकोलीत आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना लोकसभा लढवणार नसल्याचे संकेत दिले होते. काँग्रेसची राज्यातली दुसरी यादी आज रात्रीपर्यंत येण्याची शक्यता आहे.